
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातून अंगावर शहारे आणणारी एक थरारक घटना समोर आली असून, भारत-नेपाळ सीमेजवळ प्रवाशांच्या वाहतुकीवरून झालेल्या वादात एका टॅक्सी चालकाने दुसऱ्याला कारच्या बोनेटवर लटकवून तब्बल चार किलोमीटरपर्यंत गाडी पळवली. ताशी 100 किमी वेगाने धावणाऱ्या या कारच्या बोनेटवर जीव मुठीत धरून लटकलेल्या चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
ही घटना लखीमपूर खेरीतील पालिया परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर प्रवाशांना नेण्या-आणण्यावरून स्थानिक आणि बाहेरील टॅक्सी चालकांमध्ये अनेकदा वाद होत असतात. गुरुवारी लखनौहून एक टॅक्सी प्रवासी घेण्यासाठी आली असता स्थानिक चालकांनी त्याला जोरदार विरोध केला. “बाहेरच्या गाड्यांना येथून प्रवासी नेण्याची परवानगी नाही,” असे म्हणत स्थानिकांनी ती टॅक्सी अडवण्याचा प्रयत्न केला. या वादादरम्यान स्थानिक टॅक्सी चालक रामबक्ष गुप्ता यांनी लखनौच्या टॅक्सीला रोखण्यासाठी थेट गाडीच्या बोनेटवर उडी मारली. त्यांना वाटले की बोनेटवर माणूस असल्याचे पाहून चालक गाडी थांबवेल, मात्र लखनौच्या चालकाने गाडी थांबवण्याऐजी रागाच्या भरात वेग वाढवला आणि गुप्ता बोनेटवर असतानाच गाडी सुसाट पळवायला सुरुवात केली.
व्हायरल व्हिडिओमध्ये रामबक्ष गुप्ता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कारच्या वायपरला घट्ट धरून बोनेटवर लटकलेले दिसत आहेत. आरोपी चालकाने कोणतीही दया न दाखवता भरवस्तीतून आणि महामार्गावरून सुमारे 4 किलोमीटरपर्यंत ही गाडी सुसाट नेली. गुप्ता ओरडून गाडी थांबवण्याची विनंती करत होते, मात्र चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मागे असलेल्या इतर टॅक्सी चालकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने आपल्या गाड्या त्या कारच्या मागे लावल्या आणि अखेर मोठ्या कष्टाने त्या कारला घेराव घालून थांबवण्यास भाग पाडले. सुदैवाने, या जीवघेण्या प्रवासात रामबक्ष गुप्ता यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.
सुटका झाल्यानंतर आपली आपबिती सांगताना गुप्ता म्हणाले की, चालकाने गाडीचा वेग इतका वाढवला होता की आता आपला जीव जाणार असेच त्यांना वाटले होते. केवळ वायपरला घट्ट पकडून राहिल्यामुळे त्यांचा जीव वाचला, अन्यथा ते गाडीखाली चिरडले गेले असते. या घटनेची दखल घेत पालियाचे सर्कल ऑफिसर जितेंद्र सिंह परिहार यांनी सांगितले की, पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधित चालकाविरुद्ध जीवघेणा हल्ला आणि रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.





























































