समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांपासून डीएची थकबाकी न देण्याच्या निर्णयावर सरकारवर निशाणा साधला आहे. अखिलेश यादव यांनी बुधवारी एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. ‘जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या सरकारच्या दाव्याचा अर्थ कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसेही मिळू नयेत का? केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकी देण्यास नकार देणे म्हणजे एक प्रकारे ‘सरकारी हमी’ नाकारणे आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.
सातत्याने वाढणाऱ्या जीएसटी संकलनावर सरकारने सांगावे, अनेक ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चा पैसा जातो कुठे? कोट्यावधींच्या जहाजांसाठी आणि गळक्या भवनांसाठी पैसे आहेत. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाहीत. एका बाजूने वाढलेली महागाई आणि दुसऱ्या बाजूने महागाई भत्ता न मिळणे हा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. घरातील चिंता वाढतात तेव्हा त्याचा कामावरही परीणाम होईल. ज्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. भाजप सरकार फक्त निवडणुका लढतात. काम तर काही करत नाहीत आणि जे काम करतात त्यांना योग्य वेतन दिले जात नाही, असा जरोदार हल्लाबोल अखिलेश यादव यांनी केला.
भाजप सरकार ज्येष्ठांसाठी अनुकुल नाही. ज्येष्ठांचा औषधांचा खर्च वाढत आहे, मात्र पेन्शन नाही. आता ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शनसाठी उपोषण करावे, असं सरकारला वाटतंय का? शिवाय ज्येष्ठांना रेल्वेत सवलत बंद केल्याने भाजपने ज्येष्ठ नागरिकांचा अपमान केला आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले.