
उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली येथे मंगळवारी ढगफुटीचे संकट कोसळले. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढ्यांमुळे अख्खे गाव वाहून गेले.
या नैसर्गिक आपत्तीत 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जवानांसह 50 हून अधिक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
अवघ्या 34 सेकंदांत अनेक घरे आणि हॉटेल्स ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
लष्करासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.आतापर्यंत 70 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले असल्याचे हिंदुस्थानी सैन्याने म्हंटले आहे.
गंगोत्री आणि धारली येथे दोन अतिरिक्त बचाव आणि मदत पथके पाठवण्यात आली आहेत. हर्षिल ते धारली हा रस्ता मोकळा करण्यासाठी माती हलवणारी उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.
अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी ड्रोन आणि बचाव कुत्र्यांचा वापर केला जात आहे. बाहेर काढलेल्या व्यक्तींना वैद्यकीय मदत आणि अन्न पुरवले जात आहे.