Uttarakhand news – उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, पाण्याच्या लोंढ्यासह चिखल वाहून आला; अनेक घरं, हॉटेल्स कोसळली, बचावकार्य सुरू

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. मंगळवारी गंगोत्री धाम आणि मुखवा जवळील धराली गावाजवळ ढगफुटी झाली. यामुळे डोंगर-कपारीतून पाण्याच्या मोठ्या लोंढ्यासह चिखल वाहून आला. यामुळे या भागातील घरं, हॉटेल्स, होम स्टेचे नुकसान झाले असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जवळपास 50 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, धराली येथे ढगफुटी झाल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, एसडीआरफ, एनडीआरफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र खराब वातावरण, पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

उत्तराखंडमध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मंगळवारीही अनेक जिल्ह्यांना रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यात मंगळवारी दुपारी धराली येथे अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे डोंगर-कपारीतून वाहणाऱ्या नाल्यांनी नद्यांची रुप धारण केले आणि पाण्याच्या प्रचंड लोंढ्यासोबत चिखल, दगड वाहून आले. खीरगंगा नदीनेही धोक्याची इशारा पातळी ओलांडली. यामुळे आसपासच्या भागात मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा अंगावर काटा येणारा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, उत्तरकाशीतील घटनेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धराली येथे ढगफुटी झाली असून यात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त दु:खद आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि संबंधित टीम घटनास्थळी दाखल होत आहे. याबाबत आपण सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क राखून असल्याचे धामी यांनी म्हटले.