बेपत्ता पत्रकार राजीव प्रताप यांचा अखेर मृतदेह जोशीयारा तलावात आढळला; कुटुंबीयांची चौकशीची मागणी

उत्तरकाशीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डिजीटल मिडीयाचे पत्रकार राजीव प्रताप यांचा  मृतदेह अखेर जोशियारा तलावात सापडला आहे. रविवारी सकाळी 10.40 वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागाला जोशीदा बॅरेज नदीत हा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून चौकशीची मागणी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव प्रताप यांचा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांची कार नदीत पडली. 19 सप्टेंबर रोजी ती कार बाहेर काढण्यात आली होती, मात्र मृतदेह वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्या मृतदेहाचा शोध सुरु असताना दहा दिवसांनंतर तो मृतदेह जोशियारा तलावात आढळला, असे पोलिस अधीक्षक सरिता डोभाल यांनी सांगितले.  राजीव यांच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. प्रथमदर्शनी त्याची गाडी दरीत आणि नंतर नदीत पडली.या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला सापडले, ज्यामध्ये तो गाडीत एकटा असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर राजीव यांच्या पत्नी मुस्कान यांनी त्यादिवशी रात्री 11 वाजता राजीव यांच्याशी बोलणे झाले आणि त्यानंतरपासून त्याच्याशी संपर्क तुटला. त्याच्याशी बोलताना त्याने उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयाची वास्तवता  दाखवल्यानंतर तो तणावाखाली होता. त्याने आपल्या युट्युब चॅनल “दिल्ली-उत्तराखंड लाईव्ह” यावर तो रिपोर्ट दाखवला होता. मात्र त्यानंतर तो व्हिडीओ काढून टाकण्यासाठी धमकीचे फोन येत होते. रात्री 11.50 वाजता त्यांनी प्रताप यांना एक मेसेज केला जो डिलिव्हर झाला नाही. त्यामुळे त्यांचे कोणीतरी अपहरण केल्याचा संशय पत्नीने व्यक्त केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय प्रताप हे आयआयएमसीचा विद्यार्थी आहे. 18 सप्टेंबर रोजी रात्री 11.20 वाजता बस स्टॉपजवळ एका अल्टो कारमध्ये एकटे बसलेले दिसले होते. मात्र दुसऱ्या दिवशी भागीरथी नदीजवळील गंगोरी येथे त्याची कार विचित्र अवस्थेत आढळली. एसडीआरएफ आणि पोलिसांनी नदीतून कार शोधून काढली.त्यानंतर कुटुंबियांनी प्रताप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्या तपासणी दरम्यान, गाडीच्या आत चप्पल सापडली. रविवारी जोशियारा तलावात प्रताप यांचा मृतदेह आढळला. कुटुंबाने मृतदेहाची ओळख राजीव प्रताप म्हणून केली. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

राजीव प्रताप सिंह हे एक स्वतंत्र पत्रकार होते. ते “दिल्ली-उत्तराखंड लाईव्ह” नावाचे युट्युब चॅनल चालवत होते. ते उत्तरकाशीतील स्थानिक समस्या वारंवार मांडत असत. त्यांच्या पत्नीने सांगितले की त्यांनी अलीकडेच उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयाच्या वाईट स्थितीवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये भिंतींना भेगा, औषधांचा तुटवडा आणि रुग्णांच्या अवस्था दाखविण्यात आली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हापासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.