पंजाब मेल एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेमुळे शाहजहांपूरमध्ये रविवारी सकाळी घबराट पसरुन झालेल्या चेंगराचेंगरीत 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना शहाजहांपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ही घटना बरेली -कटरा स्थानकादरम्यान घडली आहे.
हावडाहून अमृतसरला जाणाऱ्या 13006 पंजाब मेल एक्स्प्रेसच्या जनरल डब्याला आग लागल्याच्या अफवेने एकच गोंधळ उडाला. ही घटना सकाळी 8च्या सुमारास घडली. हावडाहून अमृतसरला जाणारी ही ट्रेन सकाळी 10 वाजून 10 मिनीटांनी ट्रेन शाहजहांपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबविण्यात आली. यावेळी ट्रेनच्या अर्ध्या बोगी नदीच्या पुलावर आणि अर्ध्या बोगी बाहेर होत्या. ट्रेन थांबताच प्रवाशांनी घाबरुन खाली उड्या घेतल्या, त्यानंतर रेल्वे अधिकारी आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. पाच रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या होत्या. या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये भरती करण्यात आले. या दरम्यान अर्धा तास ट्रेन थांबली होती. कसून तपास केल्यानंतर ट्रेनला रवाना करण्यात आले.
मीडिया वृत्तानुसार, मुरादाबाद रेल्वे मंडळाच्या सिनीअर डीसीएम आदित्य गुप्ता यांनी सांगितले की, बिलपुरजवळ सकाळी काही टारगट लोकांनी ट्रेन नंबर 13006च्या जनरल जीएस डब्यात अग्निशमन यंत्र सक्रिय केले. ज्यानंतर गाडी रोखण्यात आले. त्यामुळे घाबरलेले प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या. जखमींना घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. तर त्या खोडकरांचा तपास करत आहेत.