
देशातील कोरोनाचा उद्रेक थोपवण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारने कोरोनाची संपूर्ण परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा केला आहे. कोरोनाची दुसरी लाट एका पातळीवर स्थिरावलेली दिसत आहे. चित्र संमिश्र आहे. मृत्यूदर स्थिर आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱया लाटेत रुग्ण लवकर बरे होत आहेत, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
देशभर ऑक्सिजन आणि लसींचा प्रचंड तुटवडा राहिल्यामुळे अनेक रुग्णांना प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे केंद्रावर टीकेची झोड उठली. मोदी सरकार वेळोवेळी न्यायालयाच्या तडाख्यात सापडले. त्यानंतरही उपाययोजना राबवण्यात कमीच पडलेल्या केंद्राने आता देशातील कोरोनाची परिस्थिती स्थिरावल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारीत 5 ते 6 लाख लोक चाचणी करीत होते, तितकीच गरज होती. आता 17 ते 18 लाख लोक चाचणी करताहेत. रुग्ण वाढले, त्याचवेळी चाचणीचे प्रमाण वाढले. 19 लाख 80 हजार चाचण्यांचा जागतिक विक्रम आहे, असे पॉल यांनी स्पष्ट केले.
लसी कमी आहेत म्हणून डोसचे अंतर वाढवले नाही!
लसींच्या तुडवाडय़ामुळेच केंद्राने कोविशिल्डच्या डोसमधील अंतर वाढवल्याची बोलले जात आहे. त्यावर हा निर्णय शास्त्रीय कारणाच्या आधारे घेतला आहे. डोसचे अंतर वाढवण्यामागे लसींचा तुटवडा हे कारण सांगणे दुःखद गोष्ट आहे. लसी कमी आहेत म्हणून डोसचे अंतर वाढवलेले नाही, असे स्पष्टीकरण डॉ. पॉल यांनी दिले.
केंद्र सरकारचे विविध दावे
कोरोना लसीकरण 62 ते 85 टक्के परिणामकारक आहे. संसर्ग कमी झाला आहे. 3 मेपासून रिकव्हरी रेट वाढला आहे. गेल्या पाच दिवसांपासून ऑक्टिव्ह रुग्णांपेक्षा अधिक लोक बरे होत आहेत. पॉझिटीव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या खाली आला आहे.
प्रत्येक महिन्याला 1 कोटी 50 लाख लसींचे उत्पादन केले जात आहे.


























































