रंगनाटय़ – भन्नाट विनोदाचा सदाबहार फार्स…!

राज चिंचणकर

मराठी रंगभूमीवरच्या सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक, ऐतिहासिक, थरार या आणि अशा विविध प्रकारच्या नाटय़कृतींच्या मांदियाळीत ‘फार्स‘ हा प्रकार उठून दिसतो तो त्यातल्या निखळ मनोरंजनाच्या वैशिष्टय़ामुळे. आतापर्यंत अनेकविध फार्स रंगभूमीवर आले आहेत आणि त्यांनी रसिकांची करमणूक करण्यात अजिबात हात आखडता घेतलेला नाही. ‘वासूची सासू’ हे असेच एक फार्सिकल नाटक रंगभूमीवर अढळ स्थान प्राप्त करून आहे. हेच नाटक सध्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या नाटय़संस्था रंगभूमीवर सादर करत आहेत आणि त्याद्वारे हमखास मनोरंजनाची हमीसुद्धा देत आहेत.

वास्तविक, ‘वासूची सासू’ हे नाटक आतापर्यंत विविध नाटय़संस्था आणि कलाकारांनी सादर केले आहे. प्रत्येकवेळी हे नाटक लोकप्रियतेचा कळस गाठत आले आहे. आतासुद्धा नव्या नटसंचात रंगभूमीवर सुरू असलेल्या या नाटकाने मनोरंजन करण्याचा घेतलेला वसा स्पष्ट दिसून येतो. फार्स उभा करणे वाटते तितके सोपे नाही; किंबहुना विनोदी नाटक गांभीर्याने करणे हेच मुळात सोपे काम नाही. ‘वासूची सासू’ या नाटकाच्या चमूने मात्र याचे अचूक व्यवधान राखत विनोदाचा बार उडवला आहे.

या नाटकाच्या शीर्षकात अंतर्भाव असल्याप्रमाणे यात ‘वासू’ आहेच; परंतु त्याच्यासोबत जी काही इतर इरसाल मंडळी आहेत; त्यांनी हे नाटक सदाबहार ठेवले आहे. यातला वासू हा अण्णांच्या घरात पेइंगगेस्ट म्हणून राहत आहे. त्याचे शीतलसोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. त्याच अनुषंगाने एक दिवस वासूला ऑफिसमध्ये दांडी मारणे आवश्यक ठरते आणि त्यासाठी तो ‘सासू मेल्याची’ थाप

ऑफिसला मारतो. वास्तविक, इथे त्याच्यापुरता प्रश्न सुटलेला आहे. पण हीच थाप त्याच्या अंगलट आली आहे. कारण त्याच्या सासूचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याच्या ऑफिसची मंडळी त्याच्या घरी यायला निघाली आहेत. आता वास्तवात नसलेली सासू आणायची कुठून, असा प्रश्न त्याला पडला असतानाच तात्पुरती खोटी सासू उभे करण्याचा पर्याय अण्णा सुचवतात. पण अशी व्यक्ती उपलब्ध करायची कशी या विचारात असतानाच अण्णांनाच सासूचे सोंग वठवण्यासाठी वासू गळ घालतो. यानंतर रंगमंचावर जे काही घडते त्याला निव्वळ धुमाकूळ असेच म्हणता येईल.

लेखक प्रदीप दळवी यांच्या या लेखनात पदोपदी विनोद पेरला गेला आहे आणि पात्रांना त्यांची सोंगे अधिकाधिक कशी रंगवता येतील याचा विचार मुळातच केला गेलेला आहे. दिग्दर्शक दुर्गेश मोहन यांनी नाटकाची राखलेली गती महत्त्वाची आहे. लेखनातल्या विनोदाचे मर्म अचूक पकडत त्यांनी हे नाटक मंचित केले आहे. फार्स या प्रकारात खरा कस लागतो तो नटमंडळींचा… आणि त्या ताकदीचे नट फार्स रंगवण्यासाठी आवश्यक असतात. या नाटकाने ही गरज पूर्ण केल्याचे जाणवते. या नाटकातल्या कलाकारांनी अंगावर असलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडली आहे. खरे तर हे नाटक यातल्या वासूचे असले तरी ‘वासू वरचढ सासू’ असेच चित्र नाटकभर दिसते. अर्थात लेखनापासून दिग्दर्शकीय संस्कार आणि पुढे नटांच्या भूमिका या संपूर्ण परिघात यातली सासूच भारी आहे. आता इतकी मोठी जबाबदारी या भूमिकेची असताना त्यासाठी तितक्याच ताकदीचा कलावंत हवा आणि ही अपेक्षा आकाश भडसावळे याने पूर्ण केली असल्याचे प्रयोगात दिसते. आपल्या शरीरयष्टीचा उत्तम उपयोग करून घेत त्याने अण्णा आणि सासू अशा दोन्ही पात्रांचा तोल नाटकात सांभाळला आहे. आतापर्यंत अनेक श्रेष्ठ कलाकारांनी या भूमिका रंगभूमीवर रंगवल्या असल्याचे दडपण त्याने घेतलेले नाही. साहजिकच, त्याच्या या भूमिका फर्मास रंगल्या आहेत.

या नाटकाचा अजून एक आकर्षणाचा भाग म्हणजे यात मालकीणबाई ही भूमिका रंगवणाऱया नयना आपटे!  फार्स या नाटय़प्रकाराचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या नयना आपटे यांनी या नाटकातही दमदार रंग भरत त्यांच्या हुकमी टाळय़ा वसूल केल्या आहेत. त्यांची ऊर्जा आणि टायमिंग अर्थातच लाजवाब!  अमोघ चंदन याने भन्नाट वेगात यात वासू उभा केला आहे.  अंकुर वाढवे याने बंडूच्या भूमिकेत धमाल उडवत नाटक खेळते ठेवले आहे. संजना पाटील, श्रुती पाटील, अथर्व गोखले, मयूरेश पंडित, तपस्या नेवे, सुयश पुरोहित, दीपक जोईल आदी कलाकारांनी हे नाटक त्यांच्या सक्षम खांद्यांवर पेलून धरत नाटकाचा ‘टेम्पो’ उंचावण्यात कुठलीही कसूर ठेवलेली नाही. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य व संकेत पाटील यांचे संगीत नाटकाचा मूड अधोरेखित करणारे आहे. एकूणच, दोन घटका निव्वळ करमणूक करत आणि पदोपदी हास्याचे कारंजे उडवत हे सदाबहार नाटक रंगमंचावर रंगले आहे.

 [email protected]