
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. याच दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भाजप नेत्याच्या लसीकरण सर्टिफिकेटने वादंग झाला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मेरठच्या सरधना येथे राम पाल सिंह हे भाजपच्या बूथ क्रमांक 79चे अध्यक्ष आहेत. ते हिंदू युवा वाहिनीचे नेता देखील आहेत. त्यांनी लस घेतल्यानंतर आपलं सर्टिफिकेट डाऊनलोड केलं. त्यात त्यांनी लसीचे पाच डोस घेतल्याचं आणि सहाव्याचं बुकिंग असल्याचं दिसत होतं.
या प्रकरणी सिंह यांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. राम पाल सिंह यांच्या म्हणण्यानुसार, 16 मार्च रोजी पहिला आणि 8 मे रोजी दुसरा डोस घेतला. पण, जेव्हा त्यांनी आपलं सर्टिफिकेट डाऊनलोड केलं तिथे मात्र पाचव्या आणि सहाव्या लसीचा उल्लेख होता.
या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पण, उत्तर प्रदेशच्या राज्य आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी अखिलेश मोहन यांच्या म्हणण्यानुसार हे पहिलंच प्रकरण आहे जिथे एखाद्याला दोनहून अधिक डोस दिलेले दिसत आहेत. प्राथमिक पातळीवर हा एखादा खोडसर प्रकार असावा, असं दिसत आहे. काही खोडसाळ व्यक्तींनी पोर्टल हॅक करून असं केलं असावं. पण याची सविस्तर चौकशी होईल, असे आदेशही दिले गेले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


























































