
पालघर जिल्ह्यातील नियोजित वाढवण बंदराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या शुक्रवारी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र या बंदराला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. यामुळेच ‘MODI GO BACK… एकच जिद्द वाढवण बंदर रद्द!’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत स्थानिकांनी केंद्र सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या महाराष्ट्रातील मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 ला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधान मोदी पालघर येथील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रमासाठी पोहोचतील. वाढवण बंदराचा प्रकल्प हा 76,200 कोटींचा आहे. त्यापैकी 74 टक्के निधी केंद्र सरकार आणि 26 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे.
स्थानिकांचा विरोध का?
वाढवण परिसरातील समुद्र मत्सबीज उत्पादनासाठी अनुकूल असल्याने याला सुवर्णपट्टा म्हणून संबोधले जाते. मात्र या भागात बंदर उभारल्यास जलसंपत्तीचा विनाश होण्याची भीती स्थानिकांच्या मनात असल्याने त्यांनी गेल्या 28 वर्षांपासून या बंदराला विरोध कायम ठेवला आहे. तसेच बंदरामुळे समुद्रातील पाणी पातळीत वाढ होईल आणि पावसाळ्यात किनाऱ्यावरील गावांमध्ये पाणी घुसेल, अशीही भिती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.