वडखळचा पाणीप्रश्न अडकला दोनशे मीटर पाईपलाईनमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

वडखळ विभागातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून केवळ 200 मीटरची पाईप लाईन न टाकल्याने येथील ग्रामस्थांना पेणवरून पिण्याचे पाणी विकत घेऊन जावे लागत आहे. शासनाने तात्काळ पाईप लाईनचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी लेखी निवेदनातून दिला आहे. या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी रायगड, मुख्याधिकारी रायगड जिल्हा परिषद, प्रांताधिकारी, तहसीलदार पेण यांना देण्यात आले आहे.

रायगड जिल्हा परिषदेमार्फत हेटवणे धरणातील पाणी वडखळ विभागातील गावांना पाईपलाईनद्वारे पुरवठा करण्याची योजना असून या योजनेतील तरणखोप गाव ते कांदळेपाडा स्टॉप पर्यंतचे काम सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झालेले असून वडखळ विभागातून पाईपलाईनचे काम सुद्धा साईलिला हॉटेल पूर्ण झालेले असताना देखील फक्त कांदळेपाडा स्टॉप ते साईलिला हॉटेल दरम्यान 200 मीटरची पाईप लाईन न टाकल्याने वडखळ विभागातील बोरी, शिर्कि, शिगणवट, बेणेघाट, कोलवे, मसद, शिर्की चाळ नंबर 1, चाळ नंबर 2 व अन्य गावातील हजारो ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे लाखो रुपये खर्च करून या गावांना अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येतो यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा अपव्यय होत आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी केला. या विभागातील ग्रामस्थांना टँकर, टेम्पो, रिक्षा, पिकप या वाहनातून पेण वरून रुपये दोनशे प्रमाणे एक पिंप असे घरटी दरमहा हजारो रुपयांचा भुर्दंडसुद्धा सोसावा लागत आहे. शासकीय अधिकाऱ्यांची मनमानी व कामचुकारपणा मुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

या रखडलेल्या कामाचे नक्की कोणते कारण आहे याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही बेकावडे यांनी केली. तसेच कांदळेपाडा स्टॉप ते साईलिला हॉटेल दरम्यान 200 मीटरची पाईप लाईन न टाकल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेकावडे यांनी दिला आहे.