वडवळमध्ये कोरोनाने खाते उघडले; तालुक्यातील नागरिकांची धाकधूक वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाॅकडाऊन पूर्वी मुंबई येथे जाऊन वडिलांच्या आजारावर उपचार घेऊन नुकतेच बुधवारी 13 मे रोजी परतलेल्या येथील एका 30 वर्षीय युवकाचा अहवाल रविवारी 17 मे रोजी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने वडवळसह चाकूर तालुक्यातील नागरिकांची आता चांगलीच धाकधूक वाढली आहे.

कामानिमित्त पुणे-मुंबई सारख्या शहरात बाहेर जिल्ह्यात असलेले मजूर, कामगार, नोकरदार, नागरिक यांचा ग्रामीण भागात आपापल्या गावी परतण्याचा ओढा सध्या चांगलाच वाढलेला आहे. मात्र हे आलेले बहुतांश नागरिक अनभिज्ञ असल्याने हे बाजारपेठेत मुक्त संचार करताना आढळून येत आहेत. दरम्यान काल चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्याने वडवळसह तालुक्यातील नागरिकांची आता धाकधूक चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, रुग्णाच्या संपर्कात व रुग्णांच्या वडिलांच्या संपर्कात येथिल अनेकजण (शेकडो) आले असल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांतून चर्चिली जात आहे. यामुळे वडवळकरांनी धसका घेतला आहे.