
चौदाव्या वर्षी वैभव सूर्यवंशीने युवा वर्ल्ड कपमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. बिनधास्त फटकेबाजी, प्रचंड स्ट्राइक रेट आणि मोठय़ा खेळींच्या जोरावर त्याने स्वतःला भविष्यातील मोठा स्टार असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र या झंझावाती फलंदाजाला बाउन्सर चेंडूंने रोखता येते, हे आता सर्वांना कळून चुकलेय. त्यामुळे वैभव हा अडथळा कसा ठोकून काढतो, याकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
या स्पर्धेत वैभवने 6 सामन्यांच्या 6 डावांत 264 धावा केल्या. 44ची सरासरी आणि 147.48चा स्ट्राइक रेट हे त्याची आक्रमक मानसिकता दाखवत आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 26 चौकार आणि 15 षटकार ठोकत प्रत्येक गोलंदाजावर दडपण आणलेय. इतक्या कमी वयात असे प्रदर्शन केल्यामुळे तो स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत असलेला फलंदाज ठरला आहे.
त्याने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 33 चेंडूंमध्ये 68 धावांची स्पह्टक खेळी करत सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला. 9 चौकार आणि 4 षटकारांसह त्याची खेळी शतकाकडे झेपावत असल्याचे चित्र उभे राहिले होते. मात्र उंच उसळणाऱया बाउन्सरवर त्याची विकेट पडली. बाउन्सरने त्याचा घात केला. हीच कथा संपूर्ण स्पर्धेत वारंवार पाहायला मिळाली. अमेरिकेविरुद्ध तो 2 धावांवर बाद झाला. बांगलादेशविरुद्ध 72 धावांची खेळी करताना आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला.
न्यूझीलंडविरुद्ध 40 धावांवर बाउन्सरवर पुल शॉट खेळताना मिड-ऑफला झेल देऊन गेला. झिम्बाब्वेविरुद्ध 2 धावांवर थेट मिड-ऑफ क्षेत्ररक्षकाकडे झेल गेला, तर पाकिस्तानविरुद्ध 30 धावांवर बाउंसरवर पुल शॉटवर चेंडू बॅटला घासत यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. सहापैकी चार म्हणजेच बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध वैभव बाउंसर चेंडूंवर बाद झाला. 6 डावांत 4 वेळा हीच कमकुवत बाजी सर्वांसमोर आलीय. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांनी त्याला टिपण्यासाठी बाउन्सर हे अस्त्र मैदानात उतरवले आहे. वैभवची फलंदाजी आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्य राखायचे असेल तर या तांत्रिक बाजूवर काम करणे गरजेचे आहे. ती सुधारणा झाली, तर हिंदुस्थानला लवकरच एक बेधडक, बिनधास्त आणि सामना फिरवणारा फलंदाज मिळेल, यात शंका नाही.
vaibhav suryavanshi’s bouncer struggle: young star’s weakness exposed in u-19 world cup
14-year-old batting sensation vaibhav suryavanshi shines in u-19 world cup but struggles against short-pitched deliveries. a detailed look at his bouncer battle.




























































