कोपरगाव – वैजापूर रस्त्याची दूरवस्था; प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैजापूरला जाण्यासाठी जुना नागपूर मुंबई महामार्ग दुसरा कोपरगाव उक्कडगाव वैजापूर तर तिसरा कोपरगाव येवला वैजापूर असे तीन मार्ग आहेत. या तिन्ही रस्त्यांची दूरवस्था झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या रस्त्यावरून वाहने चालवताना खड्डे चुकवण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. मात्र, पावसाळा उलटल्यानंतरही या रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी या रस्त्यावर खडी टाकून दुरुस्तीचे काम सुरू केले होते. त्यानंतर रस्त्याचे काम ठप्प झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली, ते काम निकृष्ट झाल्याने त्याचीही पावसात दूरवस्था झाली आहे. कोपरगाव-उकडगाव रस्त्याची काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, वर्षाच्या आतच त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे अर्धा पाऊण तासात वैजापूरला जाण्याऐवजी वाहनांना दोन ते अडीच तास लागत आहे. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सरकार या रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी देते. तरीही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित विभागाने यामध्ये लक्ष घालून त्वरित रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.