समाजभान – सोशल मीडियावरील सायबर मॉब…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैशाली मंडपे
[email protected]

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील ‘प्रायव्हसी’ रोखणे हे मोठे आव्हान असून खरात, वैद्य यांसारख्या प्रकरणांनंतर नैतिकतेचा आणि कायदेशीर चौकटीचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावरील अशा कृतींबाबत भान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

सोशल मीडिया शेअरिंग हे आजकाल आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. चांगल्या माहितीचा प्रसार करण्यासाठी जसे हे उपयुक्त आहे तसेच चुकीच्या शेअरिंगमुळे समाजात दहशत किंवा द्वेष पसरवणारेही आहे. शेअरिंगचे सकारात्मक-नकारात्मक हे दोन्हीही समाजावर परिणाम करतात. #MeToo सारख्या जागरूकता मोहिमा यशस्वी होतात, चांगले सामाजिक बदल घडतात. तसेच फेक न्यूज पसरवणे, ट्रोलिंगमुळे मानसिक ताणतणाव वाढतो, हिंसा भडकते. महाराष्ट्रातील खरात, वैद्य यांसारख्या प्रकरणांनी संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. या प्रकरणांकडे फक्त गुन्हेगारी म्हणून नव्हे, तर सोशल मीडियावरील व्हिडीओ शेअरिंग आणि कमेंट्सच्या माध्यमातून समाजाच्या नैतिकतेचा आणि कायदेशीर चौकटीचा प्रश्न उपस्थित करत आहेत. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात क्राईम सीनचे व्हिडीओ शेअर होत आहेत. अशा संवेदनशील प्रकरणात व्हिडीओ शेअरिंगमुळे कित्येक पीडितांच्या कुटुंबांना मानसिक धक्के बसले आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये आरोपीला शिक्षा देण्याच्या मागण्या केल्या, पण काहींनी स्त्रियांविषयी अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले.
अनेक जणांनी ते व्हिडीओ शेअर केले. त्यावर अनेक मिम्सही तयार झाले. अशा गंभीर प्रकारावर विनोद करावेत हे समाज म्हणून आपण किती असंवेदनशील झालो आहोत हे दर्शवते. मोहाला बळी पडून किंवा अंधश्रद्धेपायी ज्या स्त्रियांचे शोषण झाले त्यांच्याविषयीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लोकांनी कमेंटस् केल्या. ही बाब समाज किती विकृत झाला आहे याचं लक्षण आहे.

पीडितांचे व्हिडीओ पाहण्यासाठीची धडपड आणि शेअर करण्याची तत्परता दाखविली गेली. अशा घटनांचे व्हिडीओ आणि वर्णन आपल्या घरातील अल्पवयीन मुलेही बघतात. कोवळ्या वयात त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा साधा विचारही आपण करतो का? लहान वयात असे व्हिडीओ मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. बलात्कारासारखे व्हिडीओ व्हायरल करणे, त्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टिप्पणी करणे यातून समाज म्हणून आपण काय सिद्ध करतो आहोत? हे कृत्य कायदेशीर गुन्हा ठरू शकते का? सोशल मीडियावर कमेंट्स करणे ही व्यक्तिस्वातंत्र्य असले तरी कुटुंबाला बदनाम करा, बहिष्कार टाका यांसारख्या कमेंट्स उद्रेक भडकवणारे आहेत. जर कमेंटस्मुळे धार्मिक/जातीय तणाव वाढला समाजात उद्रेक झाला, समूह द्वेष पसरल्यामुळे दंगली झाल्या तर तीन वर्षांपर्यंत शिक्षा होते.

अशा अनेक घटना आहेत की, ज्या सोशल मीडियावर शेअर करताना डिजिटल युगात आपण ‘सायबर मॉब’ आहोत हे सिद्ध करतात. व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल करण्याच्या मानसिकतेमुळे सायबर मॉबिंग आणि लिचिंग होते. ज्यात एखाद्या निर्दोष व्यक्तीची प्रतिमा बिघडते आणि ट्रोलिंगमुळे पीडित व्यक्तीचे मानसिक आरोग्य उद्ध्वस्त होते – नैराश्य, एकटेपणा आणि आत्महत्येची शक्यता वाढते. आपण कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता स्वतःच न्याय करतो, शिक्षा सुनावतो… जे लोकशाहीला धोकादायक आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जागरूकता चांगलीच आहे, पण ओळख उघड करणे किंवा अपमानास्पद भाषेत कमेंट करणे हे पीडितेसाठी दुसरी शिक्षा आहे. तिचे मानसिक खच्चीकरण होते. आपण शिक्षित समाज आहोत, तरी सायबर साक्षरतेची कमतरता दिसते. 2025 चा अहवाल सांगतो की 90टक्क्यांहून अधिक भारतीय सोशल मीडिया वापरतात, पण फक्त 20 टक्के लोकांना सायबर कायदे माहीत असतात. यातून आपण ‘फास्ट जस्टिस’च्या नावाने कायद्याचे उल्लंघन करणारे, संवेदनाहीन झाले आहोत. समाजाने फॅक्ट-चेक न करता व्हिडीओ शेअरिंग टाळावे. यासाठीच सायबर साक्षरता अभियान राबवणे अत्यंत आवश्यक आहे. Ai ट्रोलिंगच्या धोक्यांची गंभीरता समजून घेऊन आपण जबाबदार नागरिक व्हावे, नाहीतर सायबर गुन्हेगारीच्या जगात व्यक्ती म्हणून नैतिकता, मानसिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था सगळंच ढासळून जाईल.

सुदृढ समाज म्हणून आपण टिकून राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जबाबदार शेअरिंग केल्यास समाज म्हणून आपण जास्त मजबूत होऊ. सोशल मीडियावर फेक न्यूज रोखणे हे आजच्या डिजिटल युगातील मोठे आव्हान आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि कायदेशीर पातळीवर जबाबदारी घेऊनच हे शक्य आहे. सोशल मीडियावरील अश्लील व्हिडीओंमुळे समाजावर गंभीर परिणाम होतात. नैतिक अधःपतन होते, ज्यामुळे पारंपरिक कुटुंब मूल्ये कमकुवत होतात. लैंगिक गुह्यांची संख्या वाढते, मानसिक आरोग्य बिघडवते. तरुणांमध्ये नैराश्य, व्यसन आणि असंवेदनशीलता वाढते. सोशल मीडियावर व्यक्त होणं ही जशी आपली व्यक्तिगत बाब असली तरी सकारात्मक गोष्टी शेअर करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
(लेखिका सायबर प्रशिक्षक आहेत.)

  • सोशल मीडियावर अश्लील आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱयावर सायबर अ‍ॅक्टमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो आणि शिक्षाही होऊ शकते. ही सर्व कृत्ये IPC आणि IT PC अ‍ॅक्टच्या अंतर्गत परिणामकारक आहेत. IT अ‍ॅक्ट 2000 च्या कलम 66ए अंतर्गत कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणारा, द्वेष पसरवणारा किंवा सार्वजनिक शांतता भंग करणारा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मजकूर पाठवणे हा गुन्हा आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणातील फोटो, व्हिडीओ शेअरिंगमुळे पीडितेची ओळख उघड होते, ज्यावर POCSO कायद्याच्या कलम 23 अंतर्गत 3 ते 5 वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. तसेच, IT अ‍ॅक्ट कलम 67 अंतर्गत अश्लील मजकूर प्रसारित केल्यास पहिल्या गुह्यासाठी 5 वर्षे तुरुंग आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड, दुसऱ्या गुह्यासाठी 10 वर्षे आणि दुप्पट दंड. क्राईम सीनचे व्हिडीओ हे अश्लील ठरू शकतात.