वैष्णोदेवी यात्रा रविवारपासून पुन्हा सुरू होणार; दररोज दोन हजार भाविकांना परवानगी

515

वैष्णोदेवीची यात्रा रविवारपासून ( 16 ऑगस्ट) पुन्हा सुरू होत आहे. मंदिरातील 8 पुजारी आणि श्राइन बोर्डचे 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने विशेष काळजी घेण्यात येत आहे. आता यात्रा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात दररोज फक्त 2 हजार भाविकांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यात जम्मू कश्मीरच्या 1900 आणि इतर राज्यातील 100 भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. या आधी दररोज पाच हजार भाविकांना परवानगी देण्याचा विचार करण्यात येत होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पहिल्या आठवड्यात दररोज दोन हजार भाविकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बॅटरी वाहन, रोप वे आणि हेलिकॉप्टरची सुविधा सुरू राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे 18 मार्चपासून वैष्णादेवी यात्रा आणि मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे श्राइन बोर्डकडून सांगण्यात आले. तसेच इतर राज्यांतून आणि जम्मू कश्मीरच्या रेडझोनमधून येणाऱ्या भाविकांकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल असणे आवश्यक असल्याचे बोर्डकडून सांगण्यात आले.

हेलिपॅड,ड्योढी गेट,बाणगंगा, कटरा या ठिकाणी भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच भाविकांनी मास्क, फेस कव्हर घालणे गरजेचे आहे. तसेच यात्रेदरम्यान, भाविकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. बॅटरी वाहन, रोप वे, हेलिकॉप्टर या सेवा सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरू करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी अटका आरती आणि विशेष पूजेत भाविकांना सहभागी होता येणार नाही. भाविकांच्या सुविधेसाठी क्लॉक रुम उघडण्यात येईल, तर कंबल स्टोर बंदच असणार आहेत. तारकोट मार्गावर मोफत लंगर आणि सांझी छत येथे प्रसाद केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान, घोडा, खेचर,तट्टू आणि पालखीचा वापर करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच 10 वर्षापेक्षा कमी, 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी, आजारी आणि गर्भवती महिलांनी यात्रेत सहभागी होणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या