
उदय जोशी । बीड
वेळ आणि परिस्थिती कशीही असो कायम वैष्णोदेवीची श्रद्धा मनात ठेवून देवीचे स्मरण करणाऱ्या बीडमधील एका भक्ताने वैष्णोदेवीचे हुबेहुब मंदिर उभारले आहे. नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना झाल्यानंतर दर्शनासाठी जिल्हाभरातील भक्तांचा ओघ वाढतच आहे.
बीड येथील व्यापारी संतोष सोहनी यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. अनेक संकटाचा सामना केला. ज्या ज्या वेळी मन उदास होत असे. त्या त्या वेळी संतोष सोहनी थेट वैष्णोदेवीचा रस्ता धरत असत. महिन्यापासून किमान एकदा तरी दर्शनासाठी ते वैष्णोदेवीकडे रवाना होत असत. गेल्या अनेक वर्षापासून हे नित्याचे चालू. पुढे परिस्थिती बदलली. आपणास वैष्णोदेवीचे दर्शन सहज शक्य होतेय मात्र सामान्यांचे काय? हा विचार मनात आला आणि बीडमध्ये विप्रनगर भागात वैष्णोदेवीची हुबेहुब प्रतिकृती तयार करून मंदिर उभारण्याचे काम हाती घेतले. तीन ते चार मजली असणारे हे मंदिर, आत प्रवेश करताच वैष्णोदेवीच्या मंदिराची आठवण करून देते. समोर हनुमंताची ६० फुट उंचीची भव्य उभी मुर्ती, विलोभनीय परिसर निश्चितच भक्तीभाव जागृत करते. दरवर्षी या वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये मोठ्या थाटात घटस्थापना केली जाते. दोन वेळा मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते. बारा महिने पुजा अर्चा आणि विविध कार्यक्रमाचेही आयोजन मंदिरामध्ये होत असते. नवरात्रामध्ये जिल्हाभरातील भाविक वैष्णोदेवीच्या या मंदिरामध्ये दर्शनासाठी रिघ लावतात. संतोष सोहनी यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील वैष्णोदेवी भक्तांना देवीचे दर्शन सुलभ झाले आहे.































































