
दुर्गेश आखाडे। रत्नागिरी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे देशपातळीवरचे नेतृत्व असूनही तळागाळात जाऊन काम करण्याची त्यांची कार्यपध्दत होती. रत्नागिरी जिल्हा हा बाणकोट पासून बांद्यापर्यंत असा अवाढव्य असल्याने रत्नागिरीत संघटनांच्या बैठका दोन-दोन दिवस चालत. त्यावेळेस जनसंघाच्या बांधणीसाठी आणि पुढे बैठकांसाठी अटलबिहारी वाजपेयी दोन-दोन दिवस रत्नागिरीत येऊन राहत असतं.

१९५३ मध्ये जनसंघाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनेच्या बांधणीसाठी वाजपेयी रत्नागिरीत आले होतें. त्यावेळी काँग्रेस भवन समोर डॉ.ज.शं केळकर यांच्या घरात जनसंघाची स्थापना झाली. १९७२ मध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर अटलबिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती. त्यानंतर पटवर्धन हायस्कूल मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे एक व्याख्यान झाले. रत्नागिरीतील स्व.डॉ.ज.शं केळकर,स्व.यशवंत माने, माजी खासदार बापूसाहेब परुळेकर यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. केंद्र सरकार मध्ये माजी खासदार बापूसाहेब परुळेकर यांनी वाजपेयींबरोबर विविध समित्यांमध्ये काम केले. माजी खासदार बापूसाहेब परुळेकर यांच्या घरीही अटलबिहारी वाजपेयी येऊन गेले आहेत. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर १९८० नंतर गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर अटलबिहारी वाजपेयी यांची जाहीर सभा झाली होती. विकासकामासाठी पंतप्रधान रत्नागिरीत येण्याचे भाग्यही रत्नागिरीकरांना वाजपेयींच्या रुपाने अनुभवायला मिळालं. १९९६ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कोकण रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रत्नागिरीत आले होते.





























































