
अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन चौक ते गांधी मैदान या रस्त्यावर असलेल्या ऐतिहासिक घोडेपीर दर्ग्याची पहाटे अज्ञातांनी तोडफोड केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री जेसीबीच्या साहाय्याने केलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करीत सीसीटीव्ही फुटेज आणि जेसीबीचा नंबर याच्याआधारे तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, दुपारी मुस्लिम समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता.
आज पहाटे तीनच्या सुमारास जेसीबी घेऊन आलेल्या व्यक्तींनी दर्ग्याची अचानक तोडफोड केली. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेसीबीचालकासोबत दोन व्यक्ती दुचाकीवरून आलेल्या दिसत आहेत.अवघ्या काही मिनिटांत या तिघांनी दर्ग्याचा काही भाग उद्ध्वस्त केला. मात्र, आजूबाजूचे नागरिक जागे झाल्याने अधिकची हानी टळली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोतवाली व तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच ही घटना शहरभर पसरली. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गांधी मैदान परिसरात सकाळपासूनच वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी जाण्यास नागरिकांना मज्जाव केला होता. पोलिसांनी तत्काळ पीराची पडझड झालेल्या ठिकाणी नव्याने बांधकाम सुरू करून दिले. तसेच मोठा बंदोबस्त तैनात केला.
या घटनेतील जेसीबीचे मालक अरुण गोविंद खरात (रा. समता चौक, सावेडी, अहिल्यानगर) यांनी जेसीबी बबलू पाल (रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, अहिल्यानगर) याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्याआधारे पोलिसांनी बबलू पाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत योगेश सखाराम झोंड (रा. बोरुडे मळा), सचिन दारकुंडे (रा. समतानगर, सावेडी), दत्ता गायकवाड व इतर चारजणांनी मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी योगेश झोंड यालाही अटक केली आहे. अरुण खरात, बबलू पाल, योगेश झोंड यांना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हजर केले आहे.
दरम्यान, या दर्ग्याची देखभाल हिंदू समाज करतो. त्यामुळे हे ठिकाण हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. अंधारात दर्ग्याची तोडफोड करणे हा भ्याडपणा आहे. त्यामुळे आरोपींसह सूत्रधारांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अश्रफी यांनी केली.
मुस्लिम समाजाचा अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
आज घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधवांनी कोठला परिसर ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा मोर्चा काढला होता. समाजकंटकांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले. यावेळी ‘आम्हाला त्याच जागी पुन्हा जसाच्या तसा दर्गा बांधण्यासाठी परवानगी द्यावी, घटनेचा मास्टरमाइंड शोधावा,’ अशी मागणी केली. दरम्यान, दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले.
मास्टरमाइंडचा शोध घेणार का?
या घटनेतील जेसीबीचा मालक कोण आहे? यासह कोण कोण साथीदार आहेत? व त्यांच्यामागे कोण आहे? या सर्व गोष्टींचा पडताळा होणे गरजेचे आहे. याची माहिती उघड झाल्यानंतर अनेक नावे उघड होणार आहेत. तसेच याच्यामागे असलेल्या मास्टरमाइंडलाही पोलीस पकडणार का? अशी चर्चा सुरू आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्वतंत्र तपास पथके स्थापन करून कारवाई सुरू केली. काही तासांतच संशयितांना ताब्यात घेतले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात बंदोबस्त तैनात केला. वरिष्ठ अधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना शांततेचे आवाहन करीत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही पोलिसांनी केले.
मास्टरमाइंड शोधा; काँग्रेसची मागणी
शहरातील आनंदी बाजार परिसरामध्ये पहाटे दर्गा पाडण्याचा प्रकार घडला. या घटनेचा काँग्रेस पक्षाने निषेध केला आहे. तसेच घटनेची सखोल चौकशी करून मास्टरमाइंडपर्यंत पोहोचावे आणि आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी शहराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केली आहे.