सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर छत्रपती शाहूमय

सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते, कोल्हापूरचे भाग्यविधाते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांना जिह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतून अभिवादन करण्यात आले. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या जन्मस्थळी तसेच ऐतिहासिक दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादनासाठी राज्यभरातून विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.

दसरा चौक येथून सकाळी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित, समतेचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामधून छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आदी महामानवांना अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संविधान दिंडी काढण्यात आली.

कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या छत्रपती शाहू जन्मस्थळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, इतिहास अभ्यासक जयसिंग पवार, इंद्रजित सावंत, वसंत मुळीक यांच्यासह विविध राजकीय सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सकाळी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, देशाला दिशा देणारे काम छत्रपती शाहू महाराज यांनी केले असून, त्यांच्या जन्मस्थळाबाबत अजून जे जे आवश्यक आहे, ते करण्यासाठी सर्व मिळून कर्तव्याची व भूमिकेची जबाबदारी घेऊन करू. या ठिकाणच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योगदान दिले आहे. यापुढेही आम्ही सर्वजण मिळून जन्मस्थळ विकासासाठी कार्य करू. अधिवेशन झाल्यावर बैठक घेऊन सर्व संघटना, समित्यांच्या सूचना व त्यांचे म्हणणे विचारात घेऊन कामांची दिशा ठरवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले, रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांनी जनतेसाठी काम केले, म्हणूनच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची पालखी वाहतो, अशा शब्दांत गौरवोद्गार काढत अभिवादन केले.

राधानगरी धरणस्थळावर शाहूजयंती उत्साहात

राजर्षी शाहू स्मृती केंद्र समिती, राधानगरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीचे आयोजन राधानगरी धरणस्थळावर करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी यशराज राजे छत्रपती उपस्थित होते. यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते राधानगरी धरणातील पाण्याचे कलशपूजन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष अभिजीत तायशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी डॉ. प्रा. चंद्रशेखर कांबळे, व्याख्याते विश्वास पाटील, तहसीलदार अनिता देशमुख, गटशिक्षणाधिकारी मेंगाने, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, अभियंता प्रवीण पारकर, लालासा मोहिते, अजित पवार, सरपंच प्रतिभा कासार, सुरेश बचाटे, सतीश फणसे, दादासा सांगावकर, विश्वास राऊत उपस्थित होते.