
>> वर्णिका काकडे
कोल्हापुरी बोली ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिह्यात बोलली जाणारी, रांगडेपणा, ओलावा आणि विशिष्ट तालावर आधारित मराठीची एक प्रमुख उपबोली आहे. या बोलीत लय काढून बोलण्याची लकब आहे. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव या बोलीवर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो. कोल्हापुरी बोलीचा जॉर्ज ग्रिअर्सनच्या 1905 च्या भारतीय भाषा सर्वेक्षणात ‘इंडो-आर्यन कुळातील भाषा’ म्हणून निर्देश आहे.
कोल्हापूरी बोलीला रांगडेपणाचा आणि उधळेपणाचा खास बाज आहे. निसर्ग, सीमावर्ती प्रदेश, लोकजीवन यांमुळे कोल्हापुरी लोकांच्या बोलण्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाषेच्या वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांहून परस्परभिन्न वाटाव्यात अशा बोली छटा मिसळल्या आहेत. कागल-गडहिंग्लज परिसरातील कानडी प्रभावाच्या बोलीमध्ये लहेजा आहे तर राधानगरी, गगनबावडा, आजरा व शाहुवाडी परिसरातील बोलण्यावर कोकणी हेल पद्धतीचा प्रभाव आहे. चंदगड परिसरात कन्नड-कोकणी-मराठी यांच्या एकत्रीकरणातून ‘चंदगडी’ बोली निष्पन्न झाली आहे. या बोलीत कानडी छापाचे हेल काढले जातात.
काही भाषा अभ्यासकांनुसार, कोल्हापुरी बोलीत सर्वच पुल्लिंगी गोष्टींना नपुसकलिंगी संबोधले जाते. या बोलीत ‘त’ चा ‘थ’ (उदा. ताक – थाक) आणि ‘द’ चा ‘ध’ (उदा. दाढी – धाढी) असा उच्चार होतो. ती प्रामुख्याने थेट, स्पष्ट आणि आदरार्थी शब्दांऐवजी आपुलकीचे शब्द वापरणारी भाषा आहे. या बोलीची अनेक वैशिष्टय़े आहेत. त्यापैकी एक शिवराळपणा. ज्यात शिव्या वादावादीत तसेच मैत्रीपूर्ण संवादातही वापरल्या जातात. ग्राम्य शब्दांच्याबाबतीत असेही दिसते की सुशिक्षित वर्गातील सभ्य सोवळ्या बोली मराठीतही अनेक ग्राम्य शब्द आहेत, जे तोंडी रुळल्यामुळे, ते ग्राम्य आहेत हे बोलणाऱयांच्या गावीही नसते. उदा. ‘गलथान’ आणि ‘अजागळ’ हे रोजच्या व्यवहारात सर्रास वापरले जाणारे शब्द.
कोल्हापूर बोलीचा वापर मराठी साहित्यात अधिकांशाने अलीकडील काळात झाला. शंकर पाटील, महादेव मोरे, नामदेव व्हटकर यांच्या साहित्यातून काही प्रमाणात सीमा भागातील विशिष्ट समूहस्तराची भाषा आली आहे. ती सीमाभाग व कोल्हापूर परिसर या प्रदेशातील भाषा आहे. 1980 नंतर मात्र राजन गवस, आनंद पाटील, कृष्णात खोत, किरण गुरव, जी. के. ऐनापुरे, अशोक पाटील, रफीक सूरज यांच्या लेखनातून त्या भाषेचा लक्षणीय आणि वेधक आविष्कार झाला आहे.



























































