बोलीभाषेची समृद्धी – लेवा बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

लेवा बोली ही खान्देशी भाषासमूहातील एक बोली आहे, जी खान्देशातील जळगाव जिह्याच्या पूर्व भागात, बऱहाणपूर जिह्यातील काही भागात व खान्देशला लागून असलेल्या बुलडाणा जिह्यातील काही सिमांत भागात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर, आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.

एका बाजूला अहिराणी भाषिक प्रदेश तर दुसऱया बाजूला मराठीची वऱहाडी बोली बोलली जाणारा प्रदेश असल्याने पूर्व खान्देशातील इतर बोलींप्रमाणे लेवा बोलीतील शब्द व व्याकरणाची अहिराणी व वऱहाडी या दोन्ही भाषांसोबत काही प्रमाणात साम्य आढळून येते. त्यामुळे ती या दोन्ही भाषांची मिश्रित बोली असल्याप्रमाणे भासते. असे असले तरीही लेवा बोलीचे अनेक शब्द व व्याकरणाची वैशिष्ट्ये या दोनही भाषांपेक्षा भिन्न आहेत.

लेवा पाटीदारांच्या शेती व्यवसायावरून आलेले लेवा गणबोलीतील काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द केवळ त्याच्याशी संबंधित लोकांनाच ठाऊक आहेत. रुम्हणं (कोळप्यासारखे अवजार), लढं (बैलगाडी), सरवा (शेंगा, भुईमूग अशा पिकांची वेचणी), ढई (बैलगाडीचा पुढचा भाग) असे अनेक शब्द या समाजापुरतेच माहीत असावेत. लेवा गण बोलीतील सर्वदूर माहीत झालेला शब्द म्हणजे आखाजी.अक्षयतृतीयेला आखाजी म्हटले जाते. खानदेशात आखाजीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही बोली सर्वसमावेशकच नाही, तर समृद्धही आहे.

लेवा गणबोलीत ‘लानी करणे’ हा शब्द खान्देशात सर्वत्र परिचित आहे. त्याचा अर्थ शेतातून ज्वारीच्या कणसांची कापणी करून खळ्यात आणण्याची संपूर्ण प्रक्रिया. इतरत्र त्यास कापणी म्हणतात. हैदराबादी मराठीत ‘भाणे’ (उष्टे) हा शब्द लेवा गणबोलीत ‘भाने मोडणे’- बाळाचे उष्टे आईने खाणे असा रूढ आहे.

प्राकृत मराठीचे स्वरूप असलेल्या संत चांगदेवांच्या ‘तत्वसार’ ग्रंथातील अनेक शब्द लेवा गणबोलीत आले आहेत. तसेच चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्र ग्रंथातीलही अनेक शब्द आहेत. लेवा बोली मध्ये फार कमी साहित्य उपलब्ध असून, कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कविता लेवा बोलीतील सर्वात प्रसिद्ध साहित्य आहेत. नि.रा. पाटील आणि ऊर्मिला पाटील यांनी ‘लेवा गण बोली कोश’ तयार केला आहे. त्यात या बोलीचा पूर्ण इतिहास व्याकरणासह दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा 2006 सालचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.