दांडग्या जनसंपर्कामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव करून आज काँग्रेसच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी विजय संपादन केला. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्यांनी हा विजय खेचून आणला.
मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता. यावेळी त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. प्रा. वर्षा गायकवाड यांच्या विजयाने काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून ही तर परिवर्तनाची सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य देत आहेत.
मुंबईकरांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवणार
धारावीच्या आमदार या नात्याने वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रश्नांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. धारावीकरांना विस्थापित करण्याच्या षड्यंत्रालाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या कडाडून विरोध करत संघर्ष करत आहेत. शिक्षणमंत्री असताना शिक्षण व्यवस्था, आश्रमशाळा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. आता संसदेत मुंबईकरांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणार आणि न्याय देणार, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
वडिलांची खूप आठवण येतेय
माझ्या वडिलांचा विजयही उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातूनच झाला होता. ते ‘जायंट किलर’ ठरले होते. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून याक्षणी वडिलांची खूप आठवण येत आहे. संपूर्ण महाविकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे मला हा विजय मिळवता आला, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी दिली.
56 हजारांची लीड तोडली
मतमोजणीवेळी दुपारी भाजपचे उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य वाढले. काही काळाने उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य 56 हजारापर्यंत पोहोचले. मात्र, शेवटच्या तीन फेऱयांमध्ये हे चित्र पूर्णपणे पालटले. दोन फेऱयांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी 56 हजारावरून प्रथम दीड हजारापर्यंत आणि नंतर 700 मतांपर्यंत खाली आणली. शेवटच्या फेरीत उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात अवघ्या 176 मतांचा फरक होता. अखेर वर्षा गायकवाड यांनी निकम यांचा पराभव केला.