अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह अनेकांना 47 लाखांचा गंडा; चित्रपट निर्मात्याविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटकांमधील आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल वर्षा उसगांवकर यांच्यासह मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री मृणालिनी सुभाष जांभळे आणि अन्य लोकांची 47 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बिल्डर आणि चित्रपट निर्माता अविनाश जाधव याच्याविरुद्ध दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवि कलम 420 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मृणालिनी सुभाष जांभळे यांची आरोपीशी व्यावसायिक ओळख होती. जाधव याने स्वतःची ओळख चित्रपट निर्माता आणि बिल्डर अशी करून दिली होती. त्याने डोंबिवलीतील एका बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आणि एका वर्षाच्या आत मुद्दल परत करण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.

नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान तक्रारदार मृणालिनी जांभळे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि इतर तिघांनी मिळून धनादेश आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला आरोपीने परतावा म्हणून 4.52 लाख रुपये परत केले होते, मात्र त्यानंतर देयके थांबवण्यात आली. जेव्हा तक्रारदारांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जाधव याने टाळाटाळ करण्यासाठी आपला मोबाईल नंबर आणि पत्ता बदलला.

जेव्हा गुंतवणूकदारांनी डोंबिवलीत त्याला गाठले, तेव्हा त्याने पैसे परत करण्यास नकार दिला आणि उलट धमकी दिली. मी पैसे परत करणार नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, असे त्याने धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी 26 फेब्रुवारी रोजी दादरच्या शिवाजी पार्क पोलिसात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.