वर्सोव्यात मच्छीमारी नौका बुडून एकाचा मृत्यू; एक बेपत्ता, एक बचावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेसावे गावातील देवाचीवाडी येथील मासेमारीहून परतत असताना होडी बुडून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. या दुर्घटनेतील एकाने पोहत किनारा गाठल्याने तो बचावला. शनिवारी रात्री 8 वाजता ही दुर्घटना घडली.

वेसावे गावातील देवाचीवाडीमधील विजय बमानिया (35), उस्मानी भंडारी (22) आणि विनोद गोयल (45) हे मासेमारीहून शनिवारी रात्री 8 च्या सुमाराला परतत असताना त्यांची होडी वर्सोवा किनाऱयापासून 3 किलोमीटरवर बुडाली. यातील विजय बमानिया याने पोहत येऊन मढ किनारा गाठला आणि झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी तत्काळ याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दल, जीवरक्षक, स्थानिक मच्छीमारांनी बुडालेल्या उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल यांचा शोध सुरू होता. दरम्यान, दुपारी यातील विनोद गोयल यांचा मृतदेह जीवरक्षकांच्या हाती लागला. शवविच्छेदनासाठी तो कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

भरतीमुळे मदतकार्यात अडथळा
शनिवारी रात्रीपासून अग्निशमन दल, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमारांकडून तसेच आज सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरमधूनही दोघांचा शोध सुरू होता. दोरखंड, हुक आणि विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करण्यात आला. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे आज दुपारी 1 वाजता शोधमोहीम थांबवण्यात आली.