
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा वर्सोवा ते भाईंदर असा 59.26 किलोमीटर कोस्टल रोड बांधण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगाने कार्यवाही सुरू आहे. या मार्गामुळे वर्सोवा ते भाईंदरला जाण्यासाठी तब्बल सवा तास रस्त्यावर होणारी रखडपट्टी थांबणार असून हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई किनारी रस्ता वर्सोवा (उत्तर-वेसावे) ते भाईंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या विविध परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱया जमिनीचे संपादन वेगाने करावे, प्रकल्प मार्गरेषेखालील शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. तसेच ‘नॉन सीआरझेड’ क्षेत्राबाहेरील काम प्रत्यक्षात सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.
असा आहे मार्ग
एकूण लांबी 59.26 किलोमीटर आहे. यामध्ये 21.86 किलोमीटर मुख्य रस्ता आणि 4.46 किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता व 32.84 किलोमीटर आंतरबदलाचा समावेश आहे.
कांदळवन हस्तांतरणास केंद्राची मंजुरी
वर्सोवा ते भाईंदर प्रकल्पाअंतर्गत कांदळवन हस्तांतरण प्रस्तावास पेंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी प्रस्तावित प्रकल्पस्थळी आढावा घेऊन सुटे भाग निर्मितीकरिता जमिनीची उपलब्धता, बांधकाम, कार्यस्थळाकडे जाणारे पोहोच रस्ते याबाबत पाहणी केली.
या मार्गाच्या कामासंबंधात भूगर्भ मातीचे सर्वेक्षण, प्रकल्प प्रगतिपथावर असताना आवश्यक असणारे विविध प्रकारचे नियोजन व आखणीमधील पर्यावरण, कामाच्या गुणवत्तेबाबतची आखणी, वाहतूक व्यवस्थापन, प्रकल्पामध्ये वापरण्यात येणारे साहित्य व विविध यंत्रसामग्री यांची जमवाजमव, प्रकल्पाचे संकल्पचित्रे व आराखडे बनवण्याचे व ते अंतिम करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.