फुटपाथवरून चालण्यास अडथळा, वांद्र्यातील होर्डिंग्ज हटवा; वरुण सरदेसाई यांची मागणी

वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये फुटपाथवर मोठय़ा प्रमाणात होर्डिंग्ज लावली गेली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालण्यास अडचण येत आहे. ती हार्ंडग्ज हटवण्यात यावीत अशी मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत केली.

गेल्या सहा महिन्यांमध्ये वांद्रे पूर्व भागातील फुटपाथवर मोठय़ा प्रमाणात होर्डिंग्ज उभारली गेली आहेत. ती इतकी मोठी आहेत यामुळे महामार्गाच्या बाजूला फुटपाथवरून चालणाऱया पादचाऱयांना होर्डिंग्ज आले की पुन्हा रस्त्यावर उतरून पुढे जाऊन पुन्हा फुटपाथवर यावे लागत आहे. या चढउतारामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुटपाथवर अशी होर्डिंग्ज उभारणे बेकायदेशीर असून ती तातडीने हटवण्यात यावीत, अशी मागणी आमदार सरदेसाई यांनी केली.

म्हाडामार्फत आमदार निधी, खासदार निधी किंवा डीपीडीसीच्या निधीतून शेड उभारल्या जातात. शेडसाठी एनओसी घेतली जाते, पण बांधकाम केले जाते ते फुटपाथवर कायमस्वरूपी होते. त्या बांधकामांमुळे नागरिक फुटपाथवरून चालू शकत नाहीत. म्हाडाकडून बांधकाम होत असले तरी शेडची परवानगी ही तात्पुरती असते. हे शंभर टक्के बेकायदा आहे, याकडेही आमदार सरदेसाई यांनी सभागृहाचे लक्ष वेधले