आयुष्यातला अर्धा वेळ वाहतूककोंडीतच जातोय…मोदीजी… आम्हाला आत्महत्या करू द्या! वाहतूककोंडीला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी मागितले इच्छामरण

>> मनीष म्हात्रे

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील खड्डे, वाहतूककोंडीला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चक्क इच्छामरणाची मागणी केली आहे. आमच्या आयुष्यातला अर्धा वेळ वाहतूककोंडीतच जातोय. त्यामुळे आम्ही जिवंत असलो तरी मेल्यासारखेच वाटते.. आता जगून करायचं तरी काय? त्यामुळे मोदीजी, आम्हाला आत्महत्या करू द्या, या मागणीचे पत्र त्रस्त नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. भूमिपुत्र फाउंडेशन व भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवल्या आहेत.

महामार्गावरील वसई, नायगाव, चिंचोटी परिसरातील खड्डेमय रस्ते आणि सततच्या वाहतूककोंडीमुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासाबद्दल वारंवार निवेदने देऊनही काहीच उपाययोजना केली जात नसल्याने या निष्क्रियतेविरुद्ध ससूनवघर गावातील शेकडो महिला आणि ग्रामस्थांचा उद्रेक झाला.

पत्रे थेट दिल्लीला रवाना

प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या नावाने स्वतंत्र पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली. प्रत्येकाने ही पत्रे पोस्टाद्वारे थेट नवी दिल्लीला पाठवली आहेत. ग्रामस्थांनी या पत्रांमध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी द्या. अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरोप काय?

भूमिपुत्र फाउंडेशन व भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले की, ठाणे घोडबंदर घाट मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही अवजड वाहने विरार फाटा व चिंचोटी येथून महामार्गावर सोडली जातात. त्याचाच परिणाम हा वाहतुकीवर होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या दुरुस्तीचा कामाचा परिणाम हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही झाला असून मागील तीन दिवसांपासून वर्सोवा पूल ते वसई फाटा या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. महामार्गावर दुरुस्तीची कामे करताना वाहतूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत अधिसूचना काढल्या जातात. अवजड वाहनांना बंदी, पर्यायी व्यवस्था अशा सर्व बाबी त्यात दिल्या जातात. मात्र वाहतूक विभागाकडूनच त्यांचे पालन होत नसल्याने आज कोंडीची समस्या तीव्र होत असल्याचा आरोप सुशांत पाटील यांनी केला आहे.