वसईतील विद्यार्थ्याला 1 कोटी 6 लाखांचे पॅकेज, परप्लेक्सिटी एआय कंपनीत मिळाली नोकरी

जागतिक स्तरावर ठसा उमटवणाऱ्या परप्लेक्सिटी एआय या कंपनीत वसईतील विद्यार्थ्याला नोकरी मिळाली असून त्याला वर्षाला 1 कोटी 6 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. जितेंद्र प्रजापती असे त्याचे नाव असून या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

केवळ 21 वर्षांचा असलेला जितेंद्र प्रजापती हा भाईंदरमध्ये राहतो. तो वसईच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून संगणक शाखेच्या अंतिम वर्षात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात त्याने उज्ज्वल यश संपादन केल्याने जितेंद्र याची परप्लेक्सिटी एआय या कंपनीने निवड केली आहे. ही निवड राज्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. राकेश हिमते यांनी सांगितले.