तिहेरी तलाक प्रकरण, आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

तलाकची नोटीस धाडून आपल्या पत्नीकडे घटस्फोट मागणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. हा कौटुंबिक वादविवाद असून एकंदरीत प्रकरण पाहता कागदपत्रावरून आरोपीच्या चौकशीची गरज वाटत नाही असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले व आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

वसई येथे राहणाऱ्या मुन्शी याचा 1998 साली विवाह झाला असून त्याला आणि त्याच्या पत्नीला तीन अपत्ये आहेत. 22 सप्टेंबर रोजी मुन्शी याने तलाक मिळावा यासाठी पत्नीला नोटीस धाडली व घटस्फोटाची मागणी केली. याप्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून आपल्याला केव्हाही अटक होईल या भीतीने आरोपी पती मुन्शी याने पालघरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, परंतु सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारत त्याला दिलासा दिला.