वाचकांना पुस्तकभेट! वसंत कानेटकरांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘हिमालयाची सावली’ अशी एकाहून एक उत्तम नाटके मराठी रंगभूमीला देणारे नाटककार वसंत कानेटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष 20 मार्चपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून कानेटकरांना अभिवादन केले जाणार आहे. कानेटकरांची अधिकाधिक नाटके आकर्षक स्वरूपात पुस्तक रूपाने उपलब्ध करण्याचे पॉप्युलर प्रकाशनने ठरवले आहे.

 वसंत कानेटकर यांनी नाटक, कथा, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकारांत लेखन केले असले तरी ते प्रामुख्याने ओळखले जातात ते नाटककार म्हणूनच. नाटककार म्हणून आपल्या 30 वर्षांच्या लेखन कारकीर्दीत त्यांनी सुमारे 40 नाटकांचे आणि काही एकांकिकांचे लेखन केले. त्यातील 30 नाटके पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. त्यातील सुरुवातीची काही पुस्तके आऊट ऑफ स्टॉक आहेत. ती आता पुन्हा प्रकाशित करण्यात येणार आहेत. जन्मशताब्दी वर्षामध्ये कानेटकरांच्या नाटकांचे पुस्तक संच काढले जाणार आहेत. या दृष्टीने पॉप्युलरने योजना आखलेली आहे.

वसंत कानेटकर यांचे ‘वेडय़ाचं घर उन्हात’ हे पहिले नाटक  पॉप्युलरने प्रकाशित केले होते. हे पुस्तक आता बरेच वर्षे मिळत नव्हते. तसंच ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘तुझा तू वाढवी राजा’ ही शिवकालावरील नाटके आम्ही प्रकाशित केली होती. त्यातील फक्त ‘रायगडला जेव्हा जाग येते’, हे उपलब्ध होते. इतर दोन पुस्तके आऊट ऑफ स्टॉक आहेत. ती पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. प्रेमाच्या गावा जावे, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड झाली अशी विनोदी ढंगाची, सुखात्मिका स्वरूपातील नाटकांचा एक संच करायचा विचार आहे. मीरा मधुरा असेल किंवा मत्स्यगंधा, वादळ माणसाळतंय, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया अशा पुस्तकांच्या संचाचीही योजना आहे.
– अस्मिता मोहिते, पॉप्युलर प्रकाशन