
राज्यात जातीविरहीत समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व समाज घटकांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात येत असल्याचे सांगत वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी 111 उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर केली.
वंचित आघाडीने कोल्हापूर, सांगली, पुणे, जळगाव, नगर, लातूर येथील 22 उमेदवारांची पहिली यादी मागील आठवड्यात जाहीर केली होती. त्यापाठोपाठ सोमवारी 111 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. निखिल विनेरकर (बोरिवली), सिद्धार्थ मोकळे (विक्रोळी), सतीश माने (भांडुप पश्चिम), मिलिंद भोळे (दिंडोशी), मोरीस केणी (चारकोप), सयीद रिझवी (मालाड पश्चिम), प्रकाश कोकरे (अंधेरी पश्चिम), शरद यटम (अंधेरी पूर्व), अब्दुल हसन खान (चांदिवली), जालिंदर सरोदे (घाटकोपर पश्चिम), विकास पवार (घाटकोपर पूर्व), मो. हाफीज खान (मानखुर्द-शिवाजीनगर), लालासाहेब लोमटे (अणुशक्ती नगर), मनीषा जाधव (कलिना), जावेद शेख (वांद्रे पूर्व), इस्तियाक जहागीरदार (वांद्रे पश्चिम), आमीर इद्रिसी (सायन कोळीवाडा), लक्ष्मण पवार (वडाळा) मुंबईतील या उमेदवारांचा समावेश आहे.
बळीराम शिरस्कर यांचा पत्ता कापला
वंचित आघाडीने भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम शिरस्कर यांचा बाळापूरमधून पत्ता कापला आहे. त्यांच्याऐवजी धैर्यवान फुंडकर यांना येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. वर्षानुवर्षे प्रकाश आंबेडकर यांना साथ देणारे शिरस्कर यांना उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची पहिली यादी घोषित
विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी माकपच्या केंद्रीय कमिटीकडून जाहीर करण्यात आली. नरसय्या आडाम (सोलापूर मध्य), जे. पी. गावीत (कळवण), डी. एल. कराड, विनोद निकोले (डहाणू) या चार उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.




























































