नाशिकमध्ये भाज्या कडाडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

दुष्काळी परिस्थितीमुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नाशिक बाजार समितीत आठवडाभरात कोथिंबीर जुडीचा भाव 13 वरून 21 रुपयांवर पोहचला. मेथीच्या जुडीची 25 रुपयांना विक्री होत आहे. फळभाज्याही आता 30 ते 60 रुपये किलोच्या घरात पोहचल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. नाशिक येथे 6 मार्च रोजी कोथिंबीरीची 1 लाख 6 हजार जुड्या आवक होती, ती आज अवघी 57 हजार जुड्या आहे. 6 मार्च रोजी कमाल भाव 13 रुपये होता, तो गुरुवारी 21 रुपयांवर पोहचला आहे. मेथीची आवक 15 हजारावरून 7 हजार जुड्यांवर घसरली असून, भाव 22 वरून 25 रुपये जुडी झाला आहे. शेपूची आवकही निम्म्यावर आली आहे. आठ दिवसांपूर्वी 22 हजार, तर आज अवघी 14 हजार जुड्या आहे. भाव 10 रुपयांवरून 15 रुपये जुडी असा वधारला आहे. फळभाज्यांची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. टोमॅटोची आवक 526 क्विंटलवरून 190 क्विंटलवर घसरली. मात्र, भावात फार मोठी वाढ नाही. 6 मार्चला 23 रुपये किलो, तर आज 25 रुपये किलो भाव होता.

सिमला, दोडका 60 रुपये किलो
सिमला मिरचीचा भाव आठवडाभरात किलोमागे 16 रुपयांनी वाढला. आज 59 रुपये किलो भाव होता. दोडक्याची 60 रुपये किलोने विक्री होत आहे. भेंडी 40, वालपापडी 30 रुपये किलो आहे. भोपळ्याचा प्रतीनग 33 रुपये भाव आहे. बाजार समितीच्या तुलनेत किरकोळ बाजारातील या भाज्यांचे भाव किलोमागे 10 ते 15 रुपयांनी जास्त आहेत. त्यामुळे या भाज्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.