
अवेळी पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून भाजीपल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा फटका भाजी विक्रेत्यासह सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे. भाजी महाग झाल्याने घरातील गृहिणीचे बजेट कोसळले आहे. त्यामुळे घरामध्ये आता एका भाजीवर कुटूंबाला अवलंबून राहावे लागत आहे.
पावसाळा ऋतू संपला तरी यावेळी पावसाने आपली रजा वाढवलेली आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी अजून अवेळी पाऊस पडत आहे. अवेळी पडत असलेल्या पावसाने शेतकरी, मच्छीमार हे हवालदिल झाले असून शेतात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. भातशेतीसोबत भाजीपालाही फुकट गेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून भाजीची आवक मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात होत असते. अवेळी पावसाने भाजीचे नुकसान झाले असल्याने ही आवक आता घटली असून येणाऱ्या भाजीचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, मटार, वांगी, कोथींबीर, सिमला मिरची, पालेभाजी यासारख्या भाज्यानी शंभरी गाठली आहे. त्यामुळे ग्राहकांची भाजी बाजारात वर्दळ कमी दिसत आहे.
जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी आपल्या शेतात मुळा, गवार, तोंडली, कोथिंबीर, वांगी यासारखी भाजी पिकवत असतात. मात्र पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात विकण्यास येणारी भाजीचे भाव वाढलेले आहेत. भाव वाढले गेले असल्याने ग्राहकही तोलून मापून भाजी विकत घेत आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यानाही याचा आर्थिक फटका बसत आहे.
भाजीचे भाव वाढले असल्याने गृहिणींनाही रोज काय भाजी करायची याची चिंता सतावत आहे. त्यामुळे रोज दोन होणाऱ्या भाज्या आता जेवणात एका भाजीवर समाधान मानावे लागत आहे. त्यातच माश्यांची आवक वाढली असल्याने मासळीचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे घरच्या गृहिणीचे जेवणाचे बजेट चांगलेच कोसळले आहे.




























































