वेंगुर्ला : आडेलीतील शेतकऱ्याने विकसित केली ‘लाल भेंडी’

419

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील अनंत दिगंबर प्रभू आजगांवकर या प्रगतशील शेतकऱ्याने ‘लाल भेंडी‘ ही भेंडीची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचे अखिल भारतीय पातळीवर चाचणी प्रयोग होवून त्याचे संपूर्ण अधिकार प्रभू आजगावकर यांना देण्यात आले आहेत. या जातीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यामुळेच शासनाने याची दखल घेत सदर भेडींच्या स्वामित्वाचे नोंदणी प्रमाणपत्र वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात समारंभपूर्वक अनंत प्रभू आजगावकर यांना सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन. सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रभू आजगावकर यांनी लाल भेंडीची जात विकसित केली. त्या जातीचे चाचणी प्रयोग होऊन त्याचे अधिकार प्रभु आजगावकर यांना देण्यात आले आहेत. या पक्रियेमध्ये त्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ.पी.एम. हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन. सावंत, प्रकल्प प्रमुख डॉ.व्ही.व्ही. दळवी आणि सहपकल्प प्रमुख डॉ.आर.जी. खांडेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

लालभेंडीची जात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. अनंत प्रभुआजगावकर यांनी विद्यापीठाच्या अविरत मार्गदर्शनामुळेच मी ही भेंडीची जात विकसीत करू शकलो व या पुढेही याच प्रकारचे काम चालू ठेवणार असल्याचे सांगितले.दरम्यान प्रास्ताविकपर मार्गदर्शनात डॉ. विजयकुमार देसाई यांनी लालभेंडीची माहिती दिली. ते म्हणाले की, लाल भेंडी जातीची लागवड खरीपमध्ये मेच्या शेवटच्या आठवडयात व उन्हाळ्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात करावी, ही जात प्रतिकूल तापमान सहन करू शकते. या कार्यक्रमाला सिधुदुर्ग समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव हे उपस्थित होते.

कशी आहे लाल भेंडी

पीक कालावधी 120 ते 130 दिवसांचा असून काढणी सुरु व्हायला 40-50 दिवस लागतात. भेंडीच्या फळांचा रंग लालसर असून लांबी 7 ते 8 इंच व उत्पन्न एक ते दीड किला प्रती झाड आहे. या जातीची लागवड जम्मू आणि काश्मिर वगळता संपूर्ण भारतात केली जाऊ शकते. ही जात पौष्टीक व शिजवल्या नंतर कमी चिकट असल्यामुळे बाजारात तिला जास्त मागणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या