
भाजीपाल्याच्या नावाखाली गावठी दारूची तस्करी करणाऱया दोघांना राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या ओ विभागाने अटक केली. कुणाल महाडीक आणि शंकर सहानी अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांकडून 280 लिटर दारू जप्त केली.
राज्यात लॉक डाऊन नंतर दारू तस्करीचे प्रकार होऊ नये त्याच्या सूचना आयुक्त कांतीलाल उमाप यांनी उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱयांना दिल्या. चोरटय़ा मार्गाने दारूची विक्री आणि तस्करी करणाऱयावर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नजर ठेवून आहेत. नायगाव येथून दोन जण गावठी दारू घेऊन येणार असल्याची माहिती ओ विभागातील आधिकाऱयाना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळून शिवशंकर पाटील, समित भोसले, कैलास तरे, नंद महाजन, पुंडलिक गवळी आदींनी आज पहाटे दहिसर चेक नाका येथे सापळा रचला.
पहाटे एक भाजीचा टेम्पो तेथे आला. त्या टेम्पोची तपासणी केली असता त्यातून 280 लिटर गावठी दारू जप्त केली. त्या दोघांनी नायगाव येथून ती दारू आणली होती. दारू लपवण्यासाठी खास टेम्पो मध्ये जागा तयार केली होती. नाकाबंदीत जर पोलिसांनी पकडले तर भाजी पाल्याचा टेम्पो आहे असे ते भासवणार होते. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.























































