पालेभाज्यांचे भाव कडाडले: कोथिंबीर 140 रुपये जुडी, कांदापात 50 रुपये जुडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यात दोन दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज आवक घटल्याने कोथिंबीर व कांदापात यांचे भाव वधारले. कोथिंबीर जुडीला 140 रुपये, तर कांदापातीला 50 रुपये जुडी असा भाव मिळाला. मात्र, फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागाला बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले. पावसामुळे शेतातच पालेभाज्या सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत एकाच दिवसात कोथिंबीरीची आवक 60 हजारावरून 40 हजार जुड्या इतकी खाली आली आहे. यामुळे चांगल्या प्रतीच्या कोथिंबीरीचा भाव वाढला आहे. हायब्रीड कोथिंबीरीचा कमाल भाव जुडीमागे 50 रुपयांनी वधारला. काल कमाल 60, तर आज 140 रुपये दर पुकारला गेला. गावठी कोथिंबीरीच्या दरात 16 रुपयांनी वाढ झाली. काल कमाल 34, तर आज 50 रुपये जुडी भाव होता. मात्र, मेथी जुडीच्या भावात एका दिवसात दोन रुपयांनी घट झाली असून, भाव 32 रुपये मिळाला. कांदापातीच्या दरात 14 रुपयांची वाढ झाली, कमाल भाव 50 रुपयांवर पोहचला होता. फळभाज्यांची आवक स्थिर आहे, भाव 22 ते 50 रुपये किलोच्या घरात आहेत.