
टीव्ही मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजा बापट यांनी बाळा गाऊ कशी अंगाई, थोरली जाऊ, एकटी, जावई विकत घेणे आहे, नवरे सगळे गाढव अशा अनेक मराठी चित्रपटांत काम केले.1970-80 च्या दशकांत त्यांनी नाटकांत भूमिका केल्या. गुलाम, जन्मदाता, हमिदाबाईची कोठी, शाकुंतल, पप्पा सांगा कुणाचे आदी नाटकांत काम केले. त्याशिवाय अनेक जाहिराती तसेच अग्निहोत्र, बे दुणे दहा , मनस्विनी, सखी या मालिकांमधून ते घरोघरी पोचले. वयाच्या अखेरपर्यंत ते सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते.






























































