
टपोरे डोळे, चेहऱयावरचे बोलके हावभाव, सशक्त अभिनय आणि दमदार नृत्यकौशल्याच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत. मराठी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ‘पिंजरा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली चंद्रकला ही तमाशातील नर्तिकेची भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. शनिवारी सकाळी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संध्या यांच्या निधनामुळे हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतले एक सुवर्णयुग संपले, अशी हळहळ व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया देशमुख. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अमर भूपाळी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट त्यावेळी तुफान चालला.
‘नवरंग’ (1959) या चित्रपटातून ‘अरे जा हरे नटखट’ या गाण्यात संध्या यांनी पुरुष आणि स्त्राr अशी वेशभूषा करून नाचत सगळ्यांनाच चकित केले. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे देखील गाजलेले चित्रपट होते. संध्या यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या.
मिळालेले पुरस्कार
‘पिंजरा’ आणि ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटासाठी संध्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच त्यांच्या कारकीर्दीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते.




























































