
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, असंघटित कामगार, वंचित कष्टकरी यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी शीला, दोन मुले असीम व अंबर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे 28 नोव्हेंबरला डॉ. बाबा आढाव यांना पूना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान आज रात्री 8.30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकऱ्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आज अंत्यसंस्कार
डॉ. बाबा आढाव यांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्या सर्व चळवळींचे पेंद्र असलेल्या मार्पेटयार्ड येथील ‘हमाल भवन’ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 ते 5 या दरम्यान, कोणताही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती रिक्षा पंचायत चळवळीतील त्यांचे सहकारी नितीन पवार यांनी दिली. पुण्यात सामान्य कुटुंबात 1 जून 1930 रोजी बाबांचा जन्म झाला. बाबासाहेब पांडुरंग आढाव हे त्यांचे पूर्ण नाव. मात्र महाराष्ट्रात डॉ. बाबा आढाव या नावानेच ते परिचित होते. ते तीन महिन्यांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आजोळीच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण महापालिका शाळेत तर, शिवाजी मराङ्गा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले.शाळेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी अर्थात 1942 मध्ये राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. त्यांनी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून 1952 मध्ये पदवी संपादन केल्यानंतर नाना पेठेत स्वतःचे वैद्यकीय क्लिनिक सुरू केले. ही प्रॅक्टिस त्यांनी 14 वर्षे चालवली आणि नंतर त्यांचा सर्व वेळ आणि संसाधने सामाजिक कार्यासाठी समर्पित केली. बाबा आढाव यांनी अन्नधान्याच्या चढया किमतींविरोधात सत्याग्रह केला. यासाठी त्यांना पहिल्यांदा तुरुंगवासही भोगावा लागला.
वैद्यकीय व्यवसायासह सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला.शीला गरुड यांच्याशी 1966 मध्ये बाबा विवाहबद्ध झाले. बाबा आढाव यांनी भारत छोडो चळवळ आणि स्वातंत्र्यलढयातही सक्रिय सहभाग घेतला. दलितांना पंढरपूर मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1948 मध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते.




























































