मंदिर उभारणीसाठी रामभक्तांकडून देणगीस्वरुपात रक्कम जमा करण्याचा विहींपचा विचार

460

सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशामुळे वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंदिर उभारणीमध्ये विश्व हिंदू परिषदेने आपलेही योगदान असावे यासाठी काही योजना आखण्याचे ठरवले आहे. या योजनेअंतर्गत जगभरातील रामभक्तांकडून देणगीस्वरूपात रक्कम जमा करण्याचा विचार सुरू केला आहे. याशिवाय पुन्हा एकदा कारसेवाही करण्याचे संकेत विहिंपने दिले आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय की राम मंदिराच्या उभारणीमध्ये रामभक्तांचेही योगदान असावे यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. या मंदिरासाठीचे आंदोलन हे देशभरातील लाखों हिंदू भाविकांसाठी आस्थेचा आणि भावनेशी निगडीत विषय राहिलेला आहे. त्यामुळे मंदिर उभारणीमध्ये आपलाही वाटा असावा असे अनेकांना वाटत आहे. यामुळेच देणगीबाबतच्या योजनेवर विचार सुरू असल्याचं बंसल यांनी सांगितलं. याशिवाय मंदिर निर्माणासाठी पुन्हा एकदा कारसेवा सुरू करण्याचाही विचार बंसल यांनी बोलून दाखवला. कारसेवा हा राम मंदिरासाठीच्या आंदोलनातला महत्वाचा भाग होता. 1990 साली आणि 1992 साली कारसेवक अयोध्येला पोहोचले होते. कारसेवेच्या दुसऱ्या टप्प्यात वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली होती.

देणगीसंदर्भातील योजना लवकरच औपचारीकरित्या जाहीर करण्यात येणार आहे. मंदिर निर्माणासाठी 3 महिन्यात एक ट्रस्ट निर्माण करण्यात येणार असून त्यामध्ये रामभक्तांना प्रातिनिधीक स्वरुपात भागीदारी मिळावी असा विहिंपचा विचार आहे. यासाठी विहिंपने देशातील सगळ्या म्हणजेच 718 जिल्ह्यांमधील रामभक्तांशी संपर्क साधला आहे. या भक्तांना एका आठवड्यासाठी अयोध्येत बोलावले जाणार असून त्यांच्याकडून मंदिराच्या उभारणीसाठी मदत घेतली जाणार आहे. देणगीस्वरुपात रक्कम गोळा करण्याबाबत म्हणजेच क्राऊडफंडींगबाबत बोलताना विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या योजनेबाबत अजिबात अस्पष्टता नसून लवकरच याची सुरुवा केली जाणार असल्याचं सांगितलं.

राम मंदिर निर्माणासाठी ज्या ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे, त्यामध्ये विहिंपला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. विहिंपचे समर्थन असलेल्या रामजन्मभूमी न्यासाला मात्र ट्रस्टमध्ये स्तान देऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. मात्र न्यायाचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांचा या ट्रस्टमध्ये समावेश केला जाईल असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या