
केडीएमसी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका शाळकरी मुलाचा हकनाक बळी गेल्याची दुर्दैवी घटना डोंबिवली येथे घडली. देवीचापाडा परिसरात बंदिस्त नाल्यावर झाकण नसल्यामुळे मॅनहोलमधून कोसळून आयुष कदम (१३) वाहून गेला. यातच त्याचा मृत्यू झाला. आयुषच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेजबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
देवीचापाडा येथील शांताराम निवासमध्ये आयुष कुटुंबासह राहत होता. तो महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद शाळेच्या अरुणोदय शाळेत सातवीत शिकत होता. रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. रात्री दहा वाजता सरोवरनगर येथील जय अंबे मंदिर परिसरात आयुष मित्रांसोबत खेळत होता. यावेळी उघड्या मॅनहोलमधून तो नाल्यात कोसळला. नाल्यावर झाकण नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. यावेळी सोबतच्या मुलांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकानी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जोराच्या प्रवाहामुळे आयुष वाहून गेला. अग्निशमन जवानांनी खाडी मुखाजवळ जाळी आडवी लावून मुलाचा शोध घेतला. एक तासाच्या मोहिमेनंतर आयुष पाण्यावर तरंगताना आढळला.
25 लाखांच्या मदतीची शिवसेनेची मागणी
नाल्यात पडून आयुषचा मृत्यू झाल्याचे समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, उपशहरप्रमुख शाम चौगले, राजेंद्र सावंत, विलास भोईर, सुजल म्हात्रे, परेश म्हात्रे, पवन म्हात्रे यांनी कदम कुटुंबीयांचे सांत्वन केले. महापालिका आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने कदम कुटुंबीयांना तातडीने २५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी यावेळी दीपेश म्हात्रे यांनी केली.