
पुण्यात ढगफुटीमुळे हाहाकार उडाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी भरले असून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे साचलेल्या पाण्यात अडकलेल्या एका दहा महिन्याच्या चिमुकल्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी टबमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी आणले आहे. या थरारक बचाव कार्याचा व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांकडून जवानांच्याया कार्याला सलाम ठोकला जात आहे.
#WATCH: Officials of Pune Municipal Corporation yesterday rescued a toddler from waterlogged area in Mitra Mandal Chowk, Pune. #Maharashtra pic.twitter.com/pyWNi1nByf
— ANI (@ANI) September 26, 2019
या बाळाचे कुटुंब स्वारगेटमधील मित्र मंडळ चौक येथे राहते. अतिवृष्टीमुळे त्यांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणीभरले होते. त्यामुळे त्या ठिकाणाहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे अत्यंत जिकरीचे काम होते. मात्र जवान मारुती देवकुळे यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावत त्या बाळाला वाचवले. त्यांनी त्या बाळाला टबमध्ये बसवून तो टब टायरच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी घेऊन आले. जवानाच्या कर्तव्यदक्षतेमुळे दहा महिन्याच्या बाळाचे प्राण वाचले. या थरारक बचाव कार्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.



























































