राजकारणाची आयपीएल झाली कोण कोणाच्या संघात तेच कळत नाही – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या राज्य आणि देशाच्या राजकारणात संभ्रमाचे वातावरण आहे. कोण कुणासोबत आहे हेच कळत नाही. ‘आयपीएल’प्रमाणे सध्याच्या राजकारणात ‘इंडियन पॉलिटिकल लीग’ सुरू झाली आहे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत केला. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतून निवृत्त झालेल्या नऊ सभासदांना सभागृहाकडून हृद्य निरोप देण्यात आला.

विधान परिषदेत सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने निवृत्त झालेल्या नऊ सभासदांना निरोप देताना विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे आदींनी भावना व्यक्त केल्या.

विधान परिषदेत सहा वर्षांची मुदत संपल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी शशिकांत शिंदे, भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर या सदस्यांना सभागृहाने निरोप दिला.

तेव्हा रेडय़ाकडून वेद म्हणून घेत आता स्वार्थासाठी रेडे कापताहेत

भोंदूबाबा अशोक खरातबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, ज्ञानेश्वर महाराज बाराव्या-तेराव्या शतकात होऊन गेले. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेडय़ाकडून वेद म्हणवून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात, हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

n सध्याच्या राजकारणात एकच संघ मजबूत होत चालला आहे. बाकीचे संघ हवेत की नको? मग मॅच खेळायला कुणी शिल्लक राहणार की नाही? बाकीचे संघ संपवून टाकले तर तो संघ कुणाशी खेळणार?, आयपीएल बघताना आपण म्हणतो अरे, हा तर आपला होता ना? पण आता तर तो दुसऱ्या टीममध्ये गेलाय. असेच राजकारण सध्या आहे!

जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणं हे मर्दाचं लक्षण नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मला सगळय़ांना धन्यवाद द्यायचे आहेत ते म्हणजे सर्व माझे त्यावेळेचे आजी-माजी सहकारी. जे मंत्रिमंडळात होते, त्याच्यानंतर सगळे शासकीय अधिकारी, मुख्य सचिवांपासून इतर सगळे सचिव, त्याच्यानंतर सगळं प्रशासन, महसूल खातं असेल, पोलीस, आरोग्य असेल, सर्वच खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना, अगदी अंगणवाडी सेविका, सरपंच सर्वच या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक प्रशासनाचा गंधही नसलेला माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसतो आणि तो राज्य चालवतोय, या सगळय़ांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसते, असे ते म्हणाले.

सुप्रसिद्ध छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विविध छटा आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॅप्चर केल्या आहेत. त्यांनी टिपलेले गडकिल्ले, निसर्ग, वारकरी परंपरेचे फोटो पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांचं संवेदनशील मन हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की, ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पाहावा विठ्ठल’ ही जी त्यांची काम आहेत, ती केवळ छायाचित्रण नाही तर एक प्रकारे आपल्या संस्कृतीची जपणूक या माध्यमातून करण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा सक्तीची केली. याचा मला नक्कीच अभिमान आहे. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, मराठी भाषा भवन, चौपाटीला मराठी रंगभूमी दालन करण्याचं ठरवलं होतं आणि वरळी डेअरी येथे जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र. याविषयी आपण विचार करावा.

ऐसी कौनसी बात थी की, किसी ‘और’ का हाथ पकडना पडा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील राजकारणी आणि संयमी नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार काढले. त्याचवेळी ‘जिनको मेरा हाथ पकडकर चलना था, वो ‘बात’ पकडकर बैठ गये,’ अशी शायरी ते बोलले. त्याला उद्धव ठाकरे यांनी शायरीतूनच उत्तर दिले. राजकारण हा माझा पिंड नाही, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचाच आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्हीदेखील माझे खूपच उत्तम वर्णन केले. मला जवळून ओळखले. मग तेव्हा ‘ऐसी कौनसी बात आ गई की, किसी ‘और’ का हाथ पकडना पडा’… असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा. त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शुभेच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज आपण सगळे एका हळव्या वळणावर उभे आहोत. सभागृहातले नऊ सदस्य निवृत्त होत आहेत. कितीही टाळलं तरी हे निरोपाचं वळण आपल्याला टाळता येत नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

तुम्ही ‘कोटय़ाधीश’… कोटय़ा पुन्हा ऐकायला मिळाव्यात

पु. ल. देशपांडेंना ‘कोटय़ाधीश’ म्हणतात, पण पुलंनंतर जर कोटय़ाधीश उपाधी कोणाला द्यायची असेल तर ती मी उद्धव ठाकरेंनाच देईन. कारण त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा मिश्कीलपणा असतो. त्यांची भाषणाची पद्धतदेखील अतिशय सहजतेने बोलण्याची किंवा एखाद्या संवादाची अशी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या सभागृहात त्यांच्या कोटय़ा पुन्हा ऐकायला मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आज सभागृहाचा निरोप घेताना माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. राजकारणात चढउतार येत असतात. पदं येतात आणि जातात. पण लोकांसाठी काय केलं आणि लोकांनी आपल्याला किती प्रेम दिलं हेच शेवटी महत्त्वाचे ठरते. मी या सभागृहाचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो!

बुवांना शक्ती देण्यापेक्षा युवांना शक्ती द्या!

अभिनेता अतुल कुलकर्णी, त्यांचं एक चांगलं वक्तव्य आलं आहे की, जे पकडले जातात ते भोंदू बुवा, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचं काय करायचं? मला असं वाटतं, आपण सगळे एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि सगळय़ा राजकारण्यांनी जर ठरवलं तर बुवाशक्तीपेक्षा युवाशक्तीला आपण जास्त ताकद दिली पाहिजे. कारण या देशामध्ये बुवा चमत्कार नाही करू शकत, युवा चमत्कार करू शकतात आणि युवाशक्तीला जर का आपण नीट पाठिंबा दिला तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय ते राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मित्रत्वाचे नाते कायम ः मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर जी काही संकटं आली त्या संघर्षाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्या संकटातून आणि संघर्षातून पुढे गेलो. अर्थात माझी व त्यांची जकळीक ही 2010 नंतर झाली आणि 2014 नंतर ती अधिक झाली. या सगळ्यात एक मैत्रीची भाकना निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली. उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्रीचे हे नाते आजही कायम आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्यातल्या सामान्य माणसालादेखील राजकीय चेहरा दिला आणि त्यातून राजकीय नेतृत्व उभं राहिलं. उद्धव ठाकरे यांनीही तो गुण जोपासला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.