‘व्ह्यूईंग गॅलरी’तून दिसणार मुंबईचे वैभव; बायनाक्युलर,टेलिस्कोपही बसवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र भगत, मुंबई

नरीमन पॉइंट येथील क्वीन्स नेकलेसची नजाकत, निळाशार समुद्र, चौपाटी आणि मुंबईचे वैभव मलबार हिल येथील ‘व्ह्यूईंग गॅलरी’तून तब्बल 285 फुटांवरून पाहता येणार आहे. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी बायनाक्युलर आणि टेलिस्कोपही बसवले जाणार असल्यामुळे मुंबई आणखीनच जवळ येणार आहे. हँगिंग गार्डनशेजारी होणाऱ्या पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून लवकरच याचे लोकार्पण होणार आहे.

‘व्ह्यूईंग गॅलरी’च्या चारमजली इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांवरून मुंबईकर-पर्यटकांना ‘स्वप्ननगरी’ मुंबईचा नजारा पाहता येणार आहे. इमारत आणि फर्निचर, लिफ्ट, टेलिस्कोप, बायनाक्युलर, वॉटर डिपार्टमेंटचा कंट्रोल रूम, कॉन्फरन्स हॉल, गार्डन ऑफिस अशा कामांसाठी एकूण 11 कोटींचा खर्च येणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या या व्हिविंग गॅलरीचे नामकरण दिवंगत शिवसेना नेते प्रमोद नवलकर असे करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी नुकतीच महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी करून आढावा घेतला. या व्ह्यूईंग गॅलरी’मुळे न्यूयॉर्क, कौलालंपूर, दुबई, बर्लिन, पॅरिसमध्ये दिसणारा अनुभव घेता येणार आहे.

शहराच्या पाणीपुरवठय़ाचा कंट्रोल रूम
संपूर्ण मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर भांडुप येथील कंट्रोल रूममधून लक्ष ठेवले जाते, मात्र आता मलबार हिल येथे होणाऱ्या व्हिविंग गॅलरीच्या तळमजल्यावर मुंबई शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी अद्ययावत कंट्रोल रूम तयार करण्यात येणार असल्याचे मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी सांगितले.

अशी आहेत ‘व्ह्यूईंग  गॅलरी’ ची वैशिष्ट्ये

  • गिरगाव चौपटीपासून नरीमन पॉइंटपर्यंत दृश्य दिसणार
  • मुंबई उच्च न्यायालय, विद्यापीठ अशा वास्तू पाहता येणार
  • एका वेळी गॅलरीत 50 प्रेक्षकांना सोडण्यात येणार
  • सुरक्षेसाठी सुमारे दीड मीटर काचेचे तावदान
  • प्रेक्षकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे
  • गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात
  • प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्क्रीन
  • दिव्यांगांसाठी लिफ्ट आणि खास रॅम्प

summery- viewing gallery in mumbai