
बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक विजय पाध्ये यांनी लिहिलेल्या ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, 24 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शिवाजी पार्क, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सकाळी 10 वाजता होईल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर, अशोक समेळ, भरत दाभोळकर, विवेक मेहेत्रे, अजित भुरे यांची विशेष उपस्थिती असेल.
1959 साली बी. वाय. पाध्ये यांनी ‘बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी’ ही जाहिरात एजन्सी सुरू केली. विजय पाध्ये यांनी 1971 सालापासून एजन्सीचे काम पाहण्यास सुरुवात केली. या 50 वर्षांच्या प्रवासातील अनुभव, आठवणी विजय पाध्ये यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत. या प्रवासात भेटलेल्या अनेक मोठय़ा आणि महनीय व्यक्ती, त्यांनी दिलेली आपुलकीची वागणूक तसेच आईवडील आणि मावशी यांच्या आठवणीही त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून जागवल्या आहेत. उद्वेली बुक्स या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.






























































