तामीळनाडूत एसआयआरला विरोध; टीव्हीके प्रमुख विजय चंद्रशेखर सर्वोच्च न्यायालयात

तामीळनाडूतील मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) विरोधात तामिलगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा एसआयआर घटनाबाह्य असल्याची तक्रार विजय यांनी याचिकेत केली आहे.

केरळ, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील एसआयआर विरोधात न्यायालयात अनेक याचिका करण्यात आल्या आहेत. त्यात आता विजय यांच्या याचिकेची भर पडली आहे. ‘एसआयआर प्रक्रियेत पूर्वसूचना किंवा सुनावणीशिवाय मतदारांची नावे वगळली जातात. हे मतदारांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे,’ असे विजय यांनी याचिकेत म्हटले आहे.

केरळ, तामीळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्याआधी एसआयआर होत आहे. या वेळेलाच अनेक पक्षांनी आक्षेप घेतला आहे. त्याशिवाय, आयोगाकडे ही प्रक्रिया राबवण्यासाठी कर्मचाऱयांची कमतरता आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे.