राज्यात दुष्काळ असताना पशुधनाला साधा चारा देण्याची व्यवस्था या सरकारने केली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नव्हता तेव्हा बोनस देण्याची घोषणा केली पण बोनस दिला नाही. पण आता निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या गायीची आठवण आली आहे. पण गायींना राज्यमातेचा दर्जा देऊन हे सरकार काय साध्य करणार आहे. पशुधन सांभाळण्याची जबादारी सरकार झटकत आहे. महायुतीला निवडणूकीसाठी गाय आठवली. दुष्काळात चारा आणि पाण्याविना तडफडत असताना गाय आठवली नाही अशी सडकून टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, सरकारला महिलांवर अत्याचार होताना माय आठवली नाही. दुधाला भाव मिळत नसताना शेतकरी संकटात होता तेव्हा भाव आठवला नाही.राजकारण भाजपसाठी धंदा, म्हणून निवडणुकीवेळी गाईला वंदा आणि निवडणुकीनंतर गाईच्या गळ्यात फंदा! अशीभाजपाची कार्यपद्धती आहे.
गायीचे मांस निर्यात करणाऱ्या कडून चंदा घेताना गाय रुपी माय या सरकारला आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावर मात्र गाय ही ‘राज्यमाता‘ घोषित केली. पण हा जुमला सुद्धा निवडणुकीत चालणार नाही. अरे किती जुमले करणार निवडणूक तोंडावर? असा सवालही वडेट्टीवार यांनी यावेळी केला आहे.