खुर्चीमागे पळणाऱ्या ‘त्या’ तिघांना रडणारा बळीराजा दिसत नाहीए, शेतकऱ्याचा व्हिडीओ शेअर करत वडेट्टीवार यांनी फटकारले

eknath shinde devendra fadnavis ajit pawar

मराठवाडा व विदर्भात सध्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले शेत पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी टाहो फोडत आहेत. असाच एका शेतकऱ्याचा रडतानाचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. तो शेतकरी त्याच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतात उभा राहून रडताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

”’मीच होणार मुख्यमंत्री’… राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये “मीच होणार मुख्यमंत्री” ही स्पर्धा सुरू आहे. तिघे ही एकमेकांना हरवण्यासाठी स्पर्धेत धावत आहेत. त्यांना हा रडणारा बळीराजा दिसत नाही, नराधमांनी अत्याचार केलेल्या पीडित लेकी दिसत नाही, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान दिसत नाही. दिसते ती फक्त मुख्यमंत्री पदाची ‘खुर्ची’. त्या खुर्चीसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून इव्हेंट करणे सुरू आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे खरीप पीक नष्ट झाले आहे, शेतकरी धाय मोकलून रडत आहेत पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

यासोबतच वडेट्टीवार यांनी आणखी एक ट्विट करत त्यात भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांचा डान्सर गौतमी पाटीलसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी एकीकडे राज्यात अतिवृष्टीमुळे भयानक परिस्थिती असताना भाजप आमदार संदीप धुर्वे गौतमी पाटीलसोबत बेभाण होऊन नाचण्यात व्यस्त आहेत. या आमदारांना ही मस्ती जनतेच्या पैश्यातून आली असून त्यांची ही मस्ती आणि बेभानपणा जनता दोन महिन्यात उतरवेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

”भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या – शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे”, असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे.