मिसाईलचा कल्पक प्रणेता

382

>> शैलेश माळोदे

निती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत. उर्जा सुरक्षेसाठी आणि नव्या तंत्रज्ञानासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

व्ही. के. सारस्वत म्हणजे सध्या नीती आयोगाचे असलेले सदस्य. पृथ्वी क्षेपणास्त्र आणि त्याचा हिंदुस्थानी सशस्त्र दलात सहभाग करवून देण्यात ते अग्रणी शास्त्रज्ञ होते. हिंदुस्थान सरकारनं त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन गौरव केला आहे. 25 मे 1949 रोजी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. माधव इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड सायन्स, ग्वालियर येथून त्यांनी अभियांत्रिकीत पदवी प्राप्त केली. म. प्र.मध्ये ग्वालियरच्या दनाओली भागात जन्मलेल्या सारस्वतांनी आयआयएससी, बंगळुरू येथून एम. ई. आणि नंतर लगेच उस्मानिया विद्यापीठातून प्रोपल्शन अभियांत्रिकीमध्ये पीएचडी प्राप्त केली.

डॉ. सारस्वत हे नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, ऍस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्सचे फेलो असून ‘समीर’ या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलसोबत उस्मानिया विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य आहेत. मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमअन्वये हिंदुस्थानला नाकारण्यात आलेल्या अनेक मिसाईल तंत्रज्ञानाचा विकास स्वतंत्रपणे घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार आहे. त्यामुळे हिंदुस्थान या क्षेत्रात आता स्वयंपूर्ण झालाय.

सध्या जेएनयूच्या कुलपतीपदाचा भारदेखील सांभाळणारे व्ही. के. सारस्वत 1972 पासून हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत (डीआरडीओ) कार्यरत होते ते 31 मे 2013 ला हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्र्यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि संघटनेचे महासंचालक म्हणून निवृत्त होईपर्यंत. 1987 साली त्यांना डीआरडीओ सायंटिस्ट ऑफ द ईयर पुरस्कार देण्यात आला. 1998 साली पद्मश्री आणि 2013 साली पद्मभूषण यांसहीत अनेक विद्यापीठांच्या मानद  डॉक्टरेट्सदेखील त्यांना प्रदान करण्यात आल्या. 2011 साली त्यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला.

अर्थात काही निर्णयांसाठी ते वादग्रस्तदेखील ठरले. अंतर्गत लेखापरीक्षण आणि कॅगने त्यांच्या काही निर्णयांबाबत धोक्याचा इशारा दिल्यावर संरक्षण मंत्रालयानं त्यांच्या वित्तीय अधिकारांत घट केली होती आणि त्यांना एक्सटेन्शनही नाकारले होते. 2009 ते 2013 या कालावधीत ते डीआरडीओचे प्रमुख होते, तसेच ते हिंदुस्थानी सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिवदेखील होते. पृथ्वीबरोबरच धनुष, प्रहार यांसारख्या क्षेपणास्त्रांबरोबरच लिक्विड प्रोपल्शन रॉकेट इंजिन्सच्या विकासाचं श्रेय त्यांच्याकडे जातं. बॅलेस्टिक मिसाईल संरक्षण कार्यक्रमाचे ते शिल्पकार मानले जातात. आपल्या डीआरडीओतील कारकीर्दीविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘मर्यादित तंत्रज्ञान साधनांचा विचार करता आपण आपल्याकडे धाडलेले मिसाईल्स एन्डो आणि एक्झो वातावरणातच रोखणारं तंत्रज्ञान  विकसित करून बीएमडी (बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स) क्षमतेमध्ये माहीर राष्ट्रांच्या गटात आपण सहभागी झालो. सोलर पॉवर्ड मॉडय़ुलर ग्रीन शेल्टर्स, बायो डायजेस्टर्स,  आधार कार्यक्रम, ज्वालाग्राही पदार्थ हुडकणारं किट, डेंग्यू आणि चिकनगुन्यासारख्या रोगांचं निदान करणारं किट यांसारख्या केवळ संरक्षणासाठीच उपयुक्त असलेल्या गोष्टी डीआरडीओनं विकसित करण्यात मोठा वाटा उचलला.’

आयआयटी मद्रासला संशोधन आणि इनोव्हेशनचं मोठं केंद्र सुरू करण्यात डॉ. सारस्वत यांचा मोठा वाटा आहे. अगदी अलीकडेपर्यंत डॉ. सारस्वत डीएई होमी भाभा अध्यासनावर होते. त्यांनी ऊर्जा सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी  या काळात विशेष प्रयत्न केले. त्यात प्रामुख्यानं, जैवभार, घन कचरा व्यवस्थापन, इंधन घट, सौर ऊर्जा, मल्टी जंक्शन फोटो व्होल्टाईक सेल्स, स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश होता. त्यासाठी विविध औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांना  त्यांनी तयार करून सहभागी करून घेतलं. हे सर्व करत असतानाच त्यांनी स्वतः संशोधन कार्य सुरू ठेवत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि परिषदांत अनेक शोध निबंध सादर आणि प्रकाशित केले. तसेच आठ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शनही केले.

नीती आयोगाचे सदस्य म्हणून विविध महत्त्वाच्या क्षेत्रांच्या विकासाबाबत आणि समस्यांबाबत सरकारला सल्ला देण्याचं  कामदेखील ते करताहेत. ‘‘हिंदुस्थानच्या संशोधन आणि विकास क्षेत्राचा वाटा वाढून जीडीपीच्या दोन टक्क्यांइतका होणे गरजेचे असून सध्या तो 0.7 ते 0.8 इतकाच आहे. तसेच आपल्या देशाच्या बौद्धिक संपादजन्य अधिकारांत वाढ व्हायला हवी. हिंदुस्थानातील मध्यम आणि लघुउद्योग क्षेत्रातदेखील याबाबतीत काम व्हायला हवं. या क्षेत्रात या प्रकारची इकोसिस्टीम नाही की, जी नवप्रवर्तनास इनोव्‘हेशनला चालना देईल. केवळ राष्ट्रीय प्रयोगशाळांपुरतेच हे मर्यादित असू नये. तरच इनोव्हेशन वेगानं होईल. त्यातून आर्थिक विकास जलदगतीने होईल. सध्या याची सर्वाधिक गरज आहे.’’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या